आयुक्तांचा आयटीयन्सशी संवाद
By Admin | Updated: February 8, 2017 03:01 IST2017-02-08T03:01:59+5:302017-02-08T03:01:59+5:30
आयटी अभियंता रसिला राजू ओपी या तरुणीच्या खून प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे शहर पोलीस

आयुक्तांचा आयटीयन्सशी संवाद
पिंपरी : आयटी अभियंता रसिला राजू ओपी या तरुणीच्या खून प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मंगळवारी हिंजवडीतील आयटी पार्क क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष अभियंत्यांबरोबर थेट संवाद साधला. त्यांना सुरक्षिततेसंबंधी भेडसवणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर योग्य त्या उपाययोजना करणार असल्याची ग्वाही दिली. इन्फोसिस कंपनीच्या पहिल्या गेटपासून ते हिंजवडी फेज २ मधील विप्रो गेट १ पर्यंत वॉक वीथ कमिशनर उपक्रमात आयटी कंपन्यांतील तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रखवालदाराच्या हल्ल्यात बळी गेलेल्या रसिला हिला आयटीयन्स तरुण, तरुणींनी आदरांजली वाहिली. त्यानंतर पोलीस आयुक्त शुक्ला यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा जनजागृती फेरी काढण्यात आली. आयुक्त शुक्ला यांनी चालता चालता अनेक तरुणींशी संवाद साधला. या जनजागृती फेरीत परिसरातील विविध आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो आयटीयन्स सहभागी झाले होते. सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, चतु:शृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर आदी उपस्थित होते. विप्रो प्रवेशद्वाराजवळ जनजागृती फेरीचा समारोप झाला.
त्यानंतर इन्फोसिस कंपनीच्या आवारात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यात आयटीक्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.
(प्रतिनिधी)