कोविड-१९ वॉर रूममधील कामकाजाचा आयुक्तांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST2021-05-14T04:12:06+5:302021-05-14T04:12:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविड-१९ वॉर रूममधून उच्च न्यायालयात सांगण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार ...

कोविड-१९ वॉर रूममधील कामकाजाचा आयुक्तांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड-१९ वॉर रूममधून उच्च न्यायालयात सांगण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी कोविड-१९ वॉर रूममधील कामकाजाचा पुनर्आढावा घेऊन तेथे सहा कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.
वॉर रूममधील सर्व कर्मचाऱ्यांनी महापालिकेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच काम करावे, फोन आल्यावर प्रथम संबंधित व्यक्तीकडून संपूर्ण माहिती घ्यावी व त्यानंतरच डॉक्टरांशी बोलून त्यांना योग्य तो सल्ला व बेडबाबतची माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले. दरम्यान ज्या शिक्षिकेने उच्च न्यायालयातील फोनवर शहरातील रूग्णालयांमध्ये पाच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असताना बेड शिल्लक नाही, अशी माहिती दिली होती. तिला गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.
विक्रम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त कार्यालयाचा डॅशबोर्ड कार्यान्वित झाल्यापासून महापालिकेच्या वॉर रूममधून आजपर्यंत ७ हजार ७०० रुग्णांना विविध प्रकारचे (ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू व साधे बेड्स) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या वॉर रूमचे काम खासगी कंपनी पाहात असून येथे तीन शिफ्ट्समध्ये ५१ कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय आठ डॉक्टरही या नियंत्रण कक्षामध्ये २४ तास कार्यरत राहणार आहेत. याचबरोबर आता महापालिकेच्या सहा कनिष्ठ अभियंत्यांचीही या वॉर रूमवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश अग्रवाल या नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेवतील असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेड व खाली होणारे बेड याची माहिती डॅशबोर्डवर अपडेट करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात महापालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याने दर चार तासाला सहानिशा करून ही माहिती अपडेट करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
--------------
डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन रिफिलिंग
महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला असून, यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसाठीच्या रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरमध्ये आता येथे ऑक्सिजन भरता येणार असल्याचेही विक्रम कुमार यांनी सांगितले.
-----------------------------------------