- अंबादास गवंडीपुणे : रिक्षाचालक हा सदैव भाडे नाकारणे, जास्त भाडे आकारणे, उद्धटपणे वागणे अशा गोष्टींसाठीच बदनाम होतो; परंतु या व्यवसायात काही रिक्षाचालक असे आहेत की, जे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करतात. त्याचा प्रत्यय नुकताच आला. रिक्षात विसरलेले प्रवाशांचे मौल्यवान वस्तू कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रवाशांना देण्यात आले. त्याच्या या प्रामाणिकपणामुळे पोलिसांकडून कौतुक करण्यात येत आहे.बाणेर रोड येथून ओरिएंटल इंटिग्रेटेड कंपनी, मुंबईचे ४० रेडिमेड गणवेश (किंमत अंदाजे ८० हजार रुपये) (दि. ३१) डिसेंबर रोजी नीरज कुमार सिंग या प्रवाशांचे दोन पार्सल बॅग कुरिअर करण्यासाठी रिक्षाचालक नासिर अजीज सय्यद यांचे रिक्षाने जात असताना सदर व्यक्तींची शिवाजीनगर परिसरात चुकामुक झाली. यामुळे त्यांचे पार्सल गहाळ झाले. दरम्यान रिक्षाचालक नासिर अजीज सय्यद यांनी प्रवाशाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला.शेवटी आझाद रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष शफिकभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर कपड्यांचे पार्सल पुणे स्टेशन हद्दीतील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे जमा केले. त्यानंतर तीन दिवसांनंतर प्रवासी नीरज कुमार सिंग यांच्याशी संपर्क झाल्याने रिक्षाचालक नासिर सय्यद व संघटनेचे अध्यक्ष शफीकभाई पटेल यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते रेडिमेड कपडे असलेले दोन पार्सल बॅग नीरज कुमार सिंग यांना सुपूर्द केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी रिक्षाचालक नासिर सय्यद यांच्या प्रामाणिकपणाचे पाठीवर थाप मारून कौतुक केले.
प्रवाशांनी रिक्षामध्ये प्रवास करीत असताना आपले कोणत्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू रिक्षामध्ये राहिले तर नाही ना, याची खात्री करणे ही प्रवाशाची जबाबदारी आहे. परंतु आपल्या विसरभोळेपणामुळे कदाचित रिक्षाचालकाची नाहक बदनामी होऊ शकते. यासाठी प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घेणे गरजेचे आहे. -शफिक पटेल, अध्यक्ष, आझाद रिक्षाचालक संघटना