लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधितांची नित्याची वाढ कधी दोनशे, तर कधी अडीशेने आतापर्यंत नोंदविली गेली. पण आज (दि. २५) शहरात केवळ ९८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आढळून आलेल्या ९८ रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत. तर यातील निम्म्याहून अधिक रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.
शहरात शुक्रवारी कोरोनाबाधित १२३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ३८५ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.१ टक्के इतकी आहे. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हची टक्केवारी हीपण आज सर्वाधिक कमी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार २५ इतकी आहेत़ आज दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७३९ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ६ हजार २३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८४ हजार ७८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७८ हजार १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
====================