पुणे : मसापच्या कार्याध्यक्षांचे पत्र... बनावट स्वाक्षरी प्रकरणाची शहानिशा करून दाखविणारी अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांच्या सहीची दोन निनावी पत्रे आणि मतदारांच्या घरोघरी फिरणाऱ्या दोन अज्ञात महिला या गोष्टींनी मतदारांना संभ्रमात टाकले असून, साहित्यवर्तुळात प्रचाराची चर्चा रंगली आहे.मसापच्या निवडणूक प्रचाराला आता ‘राजकीय’ रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर ज्या कार्याध्यक्षाबार्इंनी सदस्यांना कधी आभाराचे साधे पत्र पाठविले नाही, त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचारापासून लांब राहूनही मतदारांना पत्राद्वारे योग्य व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन करीत बुचकळ्यात टाकले आहे. ‘गेल्या काही वर्षांत काही लोकांकडून मसापची प्रतिमा वेगवेगळ्या कारणांमुळे डागाळण्याचा प्रयत्न झाला आणि पर्यायाने मसापच्या ऐतिहासिक परंपरेला धक्का बसला आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आपण योग्य व्यक्तीला मतदान कराल याची खात्री आहे, असे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी पत्रातून मतदारांना सुचविले आहे. विशेष म्हणजे हे पत्र त्यांनी मसापच्या लेटरहेडवर न लिहिता आणि परिषदेच्या कार्याध्यक्षा असा उल्लेख न करता केवळ सही करून मतदारांना पाठविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.एखाद्या पदावर असताना आणि पदाचा राजीनामा दिलेला नसताना असे पत्र पाठविता येते का, अशी विचारणा मतदारांकडून केली जात आहे. या पत्राबरोबरच बनावट सही प्रकरणाचा प्रचारासाठी वापर करून मतदारांना प्र. चिं. शेजवलकर यांच्या खऱ्या आणि बनावट सहीचे निनावी पत्र पाठविण्याचा अजब प्रकारही निवडणुकीत घडला आहे. महामंडळाच्या अध्यक्षांना पाठविलेले हे पत्र गुप्त ठेवण्यात आले होते, ते बाहेर पडलेच कसे, मुळात हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मसाप निवडणुकीला ‘निनावी’ पत्रांचा रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 01:42 IST