कोलवडीत दिवसभर तणाव
By Admin | Updated: August 20, 2015 02:37 IST2015-08-20T02:37:12+5:302015-08-20T02:37:12+5:30
कोलवडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केली असून पोलिसांच्या त्रासामुळेच हा प्रकार

कोलवडीत दिवसभर तणाव
लोणीकंद : कोलवडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केली असून पोलिसांच्या त्रासामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने मंगळवारी रात्रीपासून गावात तणावाचे वातावरण होते. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्वत: चौकशीचे व दोषीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज दुपारी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन कोलवडी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
लोणीकंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोलवडी (ता. हवेली) येथे वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण करण्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ३ आठवड्यांनी त्यातील एकाने रानमळ्यातील विहिरीत परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. या आत्महत्येला संबंधित पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद ही करण्यात आली आहे. २४ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल एम. एल. अवघडे हे नवनाथ गायकवाड या व्यक्तीच्या नावाने कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी कोलवडी येथे गायकवाडवस्तीवर गेले होते. या वेळी महेश अर्जुन पवार, परमेश्वर बबन गायकवाड व त्याचा मुलगा सतेज असे तिघे भेटले. या वेळी चौकशीदरम्यान गैरसमजातून बाचाबाची, भांडणे झाली. या तिघांनीही मारहाण केल्याचा आरोप करून अवघडे यांनी या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणला व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्या सुनेने कॉन्स्टेबल एम. एल. वारघडे यांच्याविरोधात शिवीगाळ व विनयभंगाचा तक्रार अर्ज दिला होता.
दरम्यान, दोन्ही घटनांची चौकशी व कार्यवाही बाकी असताना सोमवारी परमेश्वर बबन गायकवाड घरातून निघून गेले. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास त्यांचा मृतदेह रानमळ्याच्या विहिरीत आढळून आला.
याबाबत बाळासाहेब मुरलीधर गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत अंत्यविधीच न करण्याची भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ़ जय जाधव यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांना घटनास्थळी पाठविले़ त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली़ यावेळी नागरिकांनी लोणीकंद पोलिसांविषयी अनेक तक्रारी केल्या़ पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही़ तक्रार करणाऱ्यांनाच त्रास दिला जातो, असे सांगितले़ चिखले यांनी डॉ़ जाधव यांच्याशी ग्रामस्थांशी संपर्क करुन दिला़ डॉ़ जाधव यांनी चौकशी करु असे आश्वासन दिल्यानंतर गायकवाड यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ (वार्ताहर)