आठवड्याभरात महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:40+5:302021-02-05T05:01:40+5:30
पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे कोरोनानंतर महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील नियमावली तयार केली जात आहे. पुढील तीन ते चार ...

आठवड्याभरात महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता
पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे कोरोनानंतर महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील नियमावली तयार केली जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत ही नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेतली आहे. त्यात सर्वांनीच महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास सकारात्मकता दाखवली आहे. परिणामी येत्या आठवड्याभरात महाविद्यालये सुरू होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील पाचवीपासून ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांकडून केली जात आहे. त्यावर उच्च शिक्षण विभागही सकारात्मक आहे. परिणामी लवकरच महाविद्यालयांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले होतील. सध्या बहुतके महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन सुरू ठेवले आहे. परंतु, विज्ञान व इतर काही विषयांचे प्रत्यक्षात प्रॅक्टिकल केल्याशिवाय संबंधित विषय समजत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकलसाठी तरी शासनाने तत्काळ महाविद्यालये सुरू करावी, अशी अपेक्षा महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून केली जात आहे.
---
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची व संशोधन संस्थांची संख्या तब्बल एक हजार आहे. त्यात साडेसहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कोरोनानंतर महाविद्यालये सुरू करण्याबाबत आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना तपासणी बंधनकारक केली. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी प्राध्यापकांनासुद्धा कोरोना तपासणी करून घ्यावी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---
कोरोनानंतर महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्यपाल व उच्च शिक्षण मंत्री दोघेही सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरू होतील.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
---
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला असून थेअरीचा भाग ऑनलाईन पद्धतीने शिकवता येतो. मात्र, काही विषयांचे प्रॅक्टिकल केल्याशिवाय तो समजत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकलसाठी तरी शासनाने महाविद्यालये सुरू करणे गरजेचे आहे.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर
---
विद्यापीशी संलग्न महाविद्यालयांची संख्या
पुणे : ३८८
अहमदनगर : १३१
नाशिक : १५८
---
विद्यापीठाशी संलग्न एमबीए इन्स्टिट्यूट : २०८
संशोधन संस्था : ९४
---
विद्यापीठाशी संलग्न एकूण महाविद्यालये संशोधन संस्था : ९८३
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थी संख्या : ६.५० लाख