किरकोळ कारणावरुन महाविद्यालयीन तरुणाचा खुन
By Admin | Updated: March 28, 2017 18:55 IST2017-03-28T18:55:36+5:302017-03-28T18:55:36+5:30
किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाची दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खुन करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासात दोघांना अटक केली आहे़

किरकोळ कारणावरुन महाविद्यालयीन तरुणाचा खुन
दोघा मित्रांना अटक : सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील घटना
पुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाची दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खुन करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासात दोघांना अटक केली आहे़
आशिष विभिषण पवार (वय २०, रा़ आसावरी, नांदेड सिटी) आणि आकाश अनिलकुमार डोके (वय २०, रा़ दामोदरनगर, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत़
गौरव रामचंद्र जाधव (वय २१, रा़ सिंहगड इन्स्टिटयुट हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक, मुळ घुरसाळे, ता़ खटाव, जि़ सातारा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़ याप्रकरात मनोज सुभाषचंद्र चोरडिया (वय २४, रा़ नवले पुलाजवळ) आणि अभिजित शिंदे हे जखमी झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली़
याप्रकरणी अभिजित प्रभाकरराव शिंदे (वय २२, रा़ मधुकोश बिल्डिंग, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे़ यातील सर्व जण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून ते वेगवेगळ्या पदव्यांचे शिक्षण घेत आहेत़ गौरव जाधव, मनोज चोरडिया हे शुभम चौधरी या मित्रांचा वाढदिवस साजरा करुन रात्री कॉलेजच्या कॅम्पसमधील एव्हिकेशन कॉलेजजवळच्या पायऱ्यावर बसले होते़ आशिष पवार, आकाश डोके हे आंबेगाव येथील जत्रेला जाऊन तेथे आले़ ते गप्पा मारत बसले असताना एकाने त्यांची ओळख करुन दिली़ तेव्हा गौरव जाधव याने ओळख दाखविली नाही़ त्यावरुन त्याच्यात व आशिष पवार याच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली़ तेव्हा आभिजित शिंदे यांचा मित्र आकाश कराडकर याने दोघांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले़ मात्र, या बाचाबाचीचा राग मनात धरुन आकाश डोके हातात बांबु घेऊन आला व त्याने गौरव जाधव याच्या पायावर, डोक्यात बांबुने मारहाण केली़ आशिष पवार याने मनोज चोरडिया यालाही बांबुने मारहाण केली़ ते पाहून शिंदे हे पळत जाऊन मदतीसाठी आकाश कराडकर याला बोलवून घेऊन आला़ तेव्हा पवार याने कराडकर यालाही बांबुने मारहाण केली़ त्यानंतर ते पळून गेले़
तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना सोमवारी रात्री गौरव जाधव याचा मृत्यु झाला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला़ या दोघांचा शोध घेत असताना ते मुळगावी पळून जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी थांबले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांना मिळाली़ तेथे जाऊन पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, श्रीकांत शिंदे, तपास पथकाचे उपनिरीक्षक समाधान कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळविले. न्यायालयाने दोघांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़