लोणीत लाकडांची चोरटी वाहतूक
By Admin | Updated: May 10, 2017 03:41 IST2017-05-10T03:41:50+5:302017-05-10T03:41:50+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथील डोंगरभागातील परिसरात वन विभागाच्या हद्दीत खासगी ठेकेदार झाडाची बिनधास्त

लोणीत लाकडांची चोरटी वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथील डोंगरभागातील परिसरात वन विभागाच्या हद्दीत खासगी ठेकेदार झाडाची बिनधास्त कत्तल करीत आहेत. वन विभाग त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. हे ठेकेदार पोते भरून १० रुपयांची नाणी राजरोस वाटत असल्याने वन कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप लोणी ग्रामस्थांनी केला आहे. या चोरट्या लाकूडतोडीला आळा घालावा, अशी मागणी लोणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोणीच्या डोंगरभाग परिसरात वन विभागाच्या हद्दीत अनेक प्रकारची जंगली झाडे व औषधी वनस्पती आहेत. या झाडांची तोड काही खासगी ठेकेदार वन विभागाच्या येथील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तोडत आहेत.
कधी रात्री, तर कधी दिवसा ट्रक-टेम्पो भरून राजरोस पळवत आहेत. त्याच्या बदल्यात हे ठेकेदार पोते भरून १० रुपयांची नाणी वाटत आहेत, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे ठेकेदार ही लाकडे विविध कंपन्या, लाकडी मिल, ढाबे, सरपण विक्रेते आदींना पुरवत असून मालामाल होत आहेत.
वन विभाग या प्रकाराकडे एवढी डोळेझाक का करीत आहे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. वन खाते चिरीमिरी मिळत असल्याने मूग गिळून गप्प बसले आहे का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या झाडाच्या चोरट्या वाहतुकीला आळा न घातल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.