Cocaine confiscated arrested in Pune | पुण्यात ९१ लाखांचे कोकेन जप्त ; उच्चभ्रू वस्तीत व्हायची विक्री 
पुण्यात ९१ लाखांचे कोकेन जप्त ; उच्चभ्रू वस्तीत व्हायची विक्री 

पुणे : वाढत्या पुण्यात आधुनिकतेचे विविध पर्याय उपलब्ध होत असताना त्यातून होणारे तोटेही जाणवत आहेत. शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना तब्बल ८७ लाखांचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी शोलाडॉये सॅम्युअल (वय ४४, रावत कप्सरस्टोन सोसायटी, उंड्री) याला अटक केली आहे. 
   याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले. या पथकाने सापळा रचून उंड्री परिसरातून आरोपीच्या घरावर छापा मारला. या छाप्यात घराची झडती घेतली असता तिथे ७३३ किलो ग्रॅम कोकेन ज्याची किंमत ८७ लाख ९६ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय ३ लाख ६८हजार ०७० रुपये रोख रक्कम, १००० रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्या, ९० हजार रुपये किंमतीची तीन घड्याळे व २४ हजार किंमतीचे पाच मोबाईल सेट जप्त करण्यात आले. 
दरम्यान संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने शहरातील एनआयबीएम रस्ता व उंड्री या उच्च्भ्रू वस्तीत पदार्थ विकत असल्याचे सांगितले. दरम्यान त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध घेणे सुरु आहे. जॉय हा अतिशय शिताफीने अंमली पदार्थाची तस्करी करत होता़ त्यामुळे मागील २० दिवस पोलीस त्याच्या मागावर होते़ या व्यवसायाच्या आडून तो अंमली पदार्थांची तस्करी करीत होता़ त्याचे कोणी साथीदार आहेत का, त्याने हे कोकेन कोठून आणले तसेच यापूर्वी तो भारतात कधी आला होता का याची चौकशी करण्यात येत असल्याचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले़ यावेळी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख उपस्थित होते.

यावेळी टिकोळे म्हणाले की, ''पोलीस तिथे सध्या वेषात गेले होते. तिथे संबंधित व्यक्ती हातात एक बॅग घेऊन जाताना आढळली. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र त्याला पकडल्यावर घराची झडती घेतली आणि तो मुद्देमालासकट सापडला''. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, मोकाशी, राहुल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छदीदार, योगेश मोहिते यांनी केली.


Web Title: Cocaine confiscated arrested in Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.