‘सहकार पॅनल’चे पुन्हा वर्चस्व
By Admin | Updated: May 18, 2015 23:05 IST2015-05-18T23:05:35+5:302015-05-18T23:05:35+5:30
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने भीमाशंकर पॅनलचा धुव्वा उडवत बँकेवर पुन्हा थझवर्चस्व प्राप्त केले.

‘सहकार पॅनल’चे पुन्हा वर्चस्व
दावडी : राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने भीमाशंकर पॅनलचा धुव्वा उडवत बँकेवर पुन्हा थझवर्चस्व प्राप्त केले. या निवडणुकीत सहकार पॅनलचे १५ संचालक निवडून आले, तर भीमाशंकर पॅनलला २ जागांपर्यंत मजल मारता आली. विद्यमान संचालक व बँकेचे माजी अध्यक्ष दीपक वारुळे, संचालक विनायक घुमटकर यांना पराभवाचा मोठा धक्का बसला.
भीमाशंकर पॅनलचे प्रचार प्रमुख प्रा. पांडुरंग होले यांनाही पराभवाचा धक्का बसला. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश नाईकरे यांचा निसटता विजय झाला. बँकेच्या १७ जागांसाठी काल दि.१७ रोजी मतदान झाले होते. आज मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी निकाल घोषित केला. यामध्ये विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. तर, त्याचा प्रतिस्पर्धी भीमाशंकर पॅनलला केवळ २ जागा मिळाल्या. बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रताप आहेर हे सन १९७0- ७१ पासून सलग विजयी होत आले आहेत. मुकुंद आवटे हे सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य किरण मांजरे, किरण आहेर हे सलग पाचव्यांदा, तर विजया शिंदे या सलग चार वेळा, तर राजेंद्र सांडभोर हे सलग तिसऱ्यांदा बँकेचे संचालक म्हणून निवडून आले आहेत.
सर्वाधिक मताधिक्याने किरण आहेर हे निवडून आले आहेत. तर, अनुसूचित जाती जमातीगटातून परेश खांगटे हे ६ हजार १४८ मताधिक्याने निवडून आले. बँकेचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी आणि बँकेच्या सभासदांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. निवडीनंतर विजयी उमेदवारांनी शहरातून भव्य मिरवणुका काढल्या. (वार्ताहर)