CM Devendra Fadnavis: पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दहशवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देता येईल का त्याबाबत प्रयत्न करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गणबोटे यांच्या कोंढवा येथील निवासस्थानी तर जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जगदाळे यांची पत्नी प्रगती, मुलगी आसावरी व मातोश्री माणिकबाई जगदाळे तसेच त्यांचे इतर कुटुंबीयांचे फडणवीस यांनी सांत्वन केले व तेथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, शहर अध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, राजेश बराटे, गिरीश खत्री, विशाल रामदासी, मंजुश्री खर्डेकर उपस्थित होते.
यावेळी जगदाळे कुटुंबीयांनी पर्यटन स्थळांवरील सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. काश्मीरमध्ये घडलेल्या त्या घटनेचा संपूर्ण वृत्तांत त्यांनी फडणवीस यांना सांगितला. तसेच मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली.
जर सुरक्षा व्यवस्था असती तर लोकांचा जीव गेला नसता : गणबोटेआम्ही जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी जर सुरक्षा व्यवस्था असती तर लोकांचा जीव गेला नसता, असे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांसमोर गणबोटे कुटुंबीयांनी मांडले. गणबोटे म्हणाले की, आम्ही व इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होतो. गोळीबारचा आवाज झाल्याने आरडाओरडा सुरू झाला. पर्यटक धावपळ करू लागले, त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात कौस्तुभ गणबोटेदेखील होते. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणीस यांनी दुपारी चारच्या सुमारास गणबोटे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.
सुरक्षा, आपत्कालिन व्यवस्थेवर सवालहजारो पर्यटक काश्मिरमध्ये येतात आणि येथे दहशतवाद्यांचे कायमच हल्ले होत असतात हे माहिती असूनही सरकारने सुरक्षा ठेवली नाही, शिवाय तातडीने उपचारही मिळाले नाहीत यावर नातेवाईकांनी सवाल केला.