चोरट्याने पळविले कपाट
By Admin | Updated: May 20, 2015 23:10 IST2015-05-20T23:10:39+5:302015-05-20T23:10:39+5:30
भर वस्तीमध्ये राहणाऱ्या खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

चोरट्याने पळविले कपाट
राजगुरुनगर : भर वस्तीमध्ये राहणाऱ्या खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. कपाट उघडत नसल्याने चोरट्यांनी चक्क मोठे कपाट घेऊनच पोबारा केला़ या कपाटात २ तोळे सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये, महत्त्वाचे कागदपत्रे आणि कपडे होते़ आठवड्यातील घरफोडीची ही दुसरी मोठी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. शनिवारी १६ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाला कुलूप असल्याने आणि कपाट मजबूत असल्याने त्यांना कपाटाचे कुलूप तोडता आले नाही. या कपाटात जास्त माल असावा, असा चोरट्यांना संशय असावा की काय म्हणून चोरट्यांनी चक्क मोठे कपाटच उचलून नेले आहे. विशेष म्हणजे रात्री चोरी करताना घराचे कुलूप तोडताना शेजारी राहणाऱ्यांना थांगपत्ता लागला नाही. इतकेच नव्हे, तर घरातील मोठे कपाट चोरताना कपाटाचा आवाज आजूबाजूला कोणाला गेला नाही, हे नवल आहे. या घरफोडीची फिर्याद त्यांनी खेड पोलिसांत दिली असून, पोलीसदेखील या चोरीने चक्रावून गेले आहेत. चोरट्यांनी चक्क कपाटच उचलून नेल्याने परिसरात चर्चेचा आणि तितकाच चोरट्यांच्या दहशतीचा विषय बनला आहे.
राजगुरुनगर शहरात भरदिवसा आणि रात्री घरात कोणी नसताना पाळत ठेवून मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. आठवड्यातील मोठ्या चोरीची दुसरी घटना आहे. राजगुरुनगर शहर आणि परिसरात अनेक घरफोड्या आणि चोऱ्या होत आहेत. वाहनचोरीची संख्या लक्षणीय आहे. मात्र, पोलिसांना एकाही चोरीचा तपास लावण्यात यश आले नाही़ सध्या शाळांना सुट्ट्या, लग्नसराईची लगबग असल्याने अनेक कुटुंबे परगावी जातात. मात्र, यावर पाळत ठेवून सराईत चोर घरातील चोरी करून निघून जातात. (वार्ताहर)
पोलिसांना वाढलेल्या शहरात रात्रीची गस्त घालणे शक्य होत नाही; कारण येथे अपुरे पोलीस बळ आहे. नागरिकांनीची याबाबत खबरदारी घेऊन बाहेर जाताना घरातील दागदागिने, किमती वस्तू, किमती ऐवज त्यांच्या सुरक्षिततेवर सांभाळून ठेवावा. घरात किमती ऐवज ठेवू नये, असे आवाहन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. व्ही. इंगवले यांनी केले आहे.