लेखी आश्वासन मिळेपर्यंत बंद सुरूच
By Admin | Updated: March 24, 2017 03:48 IST2017-03-24T03:48:58+5:302017-03-24T03:48:58+5:30
डॉक्टरांवरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, तीन-चार वर्षांपासून शासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत.

लेखी आश्वासन मिळेपर्यंत बंद सुरूच
डॉक्टरांवरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, तीन-चार वर्षांपासून शासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा देत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही. त्यामुळे तातडीने अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन, पुण्याचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी केली.
जोशी म्हणाले, महाराष्ट्रात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये एक रुग्णालय बंद असल्यामुळे काही माथेफिरूंनी दगडफेक आणि तोडफोड केली. अशा घटनांनी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, याबाबत शासनस्तरावर कोणतेही ठोस पाऊले उचलली जात नाहीत, हे चिंताजनक आहे. २०१४ मध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. त्या वेळी हा संप मागे घेण्यासाठी उच्च
न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतची आश्वासने दिली. मात्र, तीन वर्षांत त्यातील कोणत्याच आश्वासनाची पूर्तता आणि प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा घेतलेल्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. सशस्त्र सुरक्षारक्षक नेमले जावेत, रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टिम लावावी, नातेवाइकांसाठी पासची यंत्रणा राबवावी, सुरक्षायंत्रणा सक्षम करावी, डॉक्टरांवरील हल्ल्यांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, सुरक्षा समिती स्थापन करावी अशा अनेक मागण्या तीन-चार वर्षांपासून केल्या जात आहेत.
या वेळीही ११०० सुरक्षारक्षक नेमले जातील, रुग्णाच्या नातेवाइकांना पास दिले जातील, अशी आश्वासने देऊन संप मागे घेण्यास प्रवृत्ता केले जात आहे. मात्र, सर्व मागण्या लेखी स्वरुपात पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.
रुग्णाच्या नातेवाइकांची आणि एकूणच समाजाची डॉक्टरांप्रति मानसिकता बदलण्याची गरज आहे. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचे अपुरे ज्ञान यामुळे लोकांना माहिती आणि ज्ञान यातील तफावत लक्षात येत नाही, असे नमूद करून जोशी म्हणाले, डॉक्टरांनी उपचार केले की रुग्णाला लगेच बरे वाटावे, असे त्यांना वाटते. रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालीच पाहिजे, अशीही त्यांची इच्छा असते. बरेचदा नामवंत डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यासाठी रुग्ण येतात. पण, ते डॉक्टर एखादे वेळीच दिसतात. इतर वेळी सहायाक डॉक्टर उपचार करत असल्याने रुग्ण नाराज होतात. ‘फेसलेस मेडिकल प्रॅक्टिस’ त्यांना पटत नाही.
रुग्णसेवा हा डॉक्टरांचा मूळ उद्देश असतो आणि त्यासाठी ते झटत असतात. परंतु, प्रत्येक वेळी परिस्थिती डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली राहीलच असे नाही. त्यामुळे लोकांनी डॉक्टरांना समजून घेणेही आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
अमीर खानने डॉक्टरांबद्दल केलेल्या वक्तव्यामध्ये ३० टक्के सत्य आणि ७० टक्के असत्य आहे. प्रत्येक व्यवसायात चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे लोक असतात. म्हणून, सगळ्याच डॉक्टरांना वाईट ठरवता येणार नाही. डॉक्टरांवर हल्ले होत असतील तर रुग्णांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. रुग्णाबाबत गंभीर परिस्थिती उद्भवल्यास सामान्य लोकांना डॉक्टर परिस्थिती समजावून सांगतात. मात्र, मद्यपान करुन रुग्णालयात घुसखोरी करणाऱ्यांना कोणत्या भाषेत समजावणार? म्हणूनच, शासनाने तातडीने तात्पुरते सुरक्षारक्षक नेमल्यास आणि लेखी निवेदन दिल्यास डॉक्टर सर्व वैद्यकीय सेवा सुरळीतपणे पुरवू शकतील.
आयएमएने पुकारलेल्या बंदला डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.