क्लिनिकला आग; सहा जणांना सुखरूप काढले बाहेर
By Admin | Updated: October 11, 2015 04:34 IST2015-10-11T04:34:29+5:302015-10-11T04:34:29+5:30
लाल महालासमोरील एका इमारतीतील क्लिनिकला रात्री उशिरा आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट उसळल्याने इमारतीतील सहा रहिवासी इमारतीच्या टेरेसवर जाऊन थांबले होते.

क्लिनिकला आग; सहा जणांना सुखरूप काढले बाहेर
पुणे : लाल महालासमोरील एका इमारतीतील क्लिनिकला रात्री उशिरा आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट उसळल्याने इमारतीतील सहा रहिवासी इमारतीच्या टेरेसवर जाऊन थांबले होते. त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
व्यावसायिक इमारतीमध्ये डॉ. टण्णू क्लिनिकला रात्री पावणेअकराच्या सुमारास आग लागली होती. ही इमारती तीन मजली असून, पहिल्या दोन मजल्यांवर व्यावसायिक गाळे आहेत, तर तिसऱ्या मजल्यावर काही नागरिक राहतात. आग लागल्याचे समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला त्याची माहिती दिली. दलाच्या तीन गाड्या व एक पाण्याच्या टँकर घटनास्थळी दाखल झाले. पुढील १० ते १५ मिनिटांत दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, सुरुवातीला धुरामुळे नेमकी आग कुठे लागली, हे समजत नव्हते. इमारत बंदिस्त असल्याने धुराचे प्रमाण अधिक होते. तसेच, तिसऱ्या मजल्यावरील सहा जण धुराचे लोट उठल्यामुळे इमारतीच्या टेरेसवर जाऊन मदत मागत होते. त्यांना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अग्निशामक दलाचे स्टेशन आॅफिसर प्रकाश गोरे यांनी दिली.