मराठी भाषा विभागाचा अशुद्धलेखनाचा कळस
By Admin | Updated: August 8, 2015 00:50 IST2015-08-08T00:50:05+5:302015-08-08T00:50:05+5:30
‘भाशा’, ‘षुद्धलेखन’, ‘मुद्रितषोधन’, ‘कौषल्य’, ‘मुखपृश्ठ’ हे शब्द कुठल्या अमराठी भाषिक किंवा प्रिंटिंगच्या चुका असलेल्या पुस्तकांमधले असतील,

मराठी भाषा विभागाचा अशुद्धलेखनाचा कळस
नम्रता फडणीस, पुणे
‘भाशा’, ‘षुद्धलेखन’, ‘मुद्रितषोधन’, ‘कौषल्य’, ‘मुखपृश्ठ’ हे शब्द कुठल्या अमराठी भाषिक किंवा प्रिंटिंगच्या चुका असलेल्या पुस्तकांमधले असतील, असे प्रथमदर्शनी वाटू शकते. पण थांबा, इथेच गफलत होण्याची शक्यता आहे. कारण हे शब्द आहेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रथम वर्षाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या (एम.ए.) पहिल्या भागाच्या अभ्यासक्रमातले. भाषेचे अस्तित्व टिकविण्याची धुरा खांद्यावर घेतलेल्या मराठी भाषा विभागाने भाषेच्या ‘अशुद्धलेखना’चा हा कळस गाठून भाषाप्रेमींना थक्क केले आहे. विभागाच्या या अशुद्धलेखनाची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच रंगत आहे.
एकीकडे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याबरोबरच तिला ‘राजभाषा’ म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न होत असताना विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे हे ‘भाषा’प्रेम पाहून ‘हसावे की रडावे’ अशी गत प्रत्येक भाषाप्रेमीची झाली आहे. खरे तर या विभागातून बाहेर पडणाऱ्या पिढीकडून भाषेचे संवर्धन व्हावे हीच माफक अपेक्षा असते; पण अभ्यासक्रमातले हे अशुद्ध शब्द पाहता आपण प्रमाण भाषेचे कोणते विद्यार्थी तयार करणार आहोत, याची प्रचिती येते. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन शिकणे शक्य नसते, ते बहि:स्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतात, हे प्रमाण साधारणपणे ६० ते ७० टक्के असते. पण, अभ्यासक्रमातच एवढ्या शुद्धलेखनाच्या चुका असतील तर विभागाच्या शिक्षण पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.