वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:23+5:302021-07-24T04:09:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा ...

Climate change has also changed the rainfall, such incidents will increase in the future | वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार

वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. जी ढगांच्या निर्मितीसाठी अनुकूल असल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. हे वारे पूर्वेला सरकले आणि बाष्प घेऊन आले. सह्याद्रीच्या पूर्वभागेच्या ४० किमीच्या पट्ट्यांमध्ये परत त्या वाऱ्यांना उद्वगती प्राप्त झाली आणि त्या भागात चांगला पाऊस पडला. या पट्ट्यात सर्व नद्यांचे उगम आहेत. त्यामुळे धरणात पाणी जमा झाले आणि पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परंतु हे जरी तत्कालीन कारण असले तर त्यामागे वातावरणीय बदल देखील कारणीभूत आहे. पावसाचा पॅटर्न बदलल्यामुळे भविष्यात अशा घटना वाढतच जाणार आहेत, असा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूरसह कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ते म्हणाले, १९८० पासून वातावरणीय बदलाचा पावसावर परिणाम होत आहे. २६ जुलै २००५ चा मुंबई प्रलय सर्वांना परिचित आहे. आता पाऊस हा दक्षिण भागापुरताच सीमित राहू लागला आहे. उत्तर भागात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी आहे. फक्त मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणामध्ये व कर्नाटकात पाऊस जास्त आहे. वातावरणीय बदल, उतरेकडून तत्कालीन येणारे वारे यांचाही हा परिणाम आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सांगलीला पूर आला. त्यावर शासनाने वडनरे समिती नेमली होती. त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या. शक्य आहे. केवळ दोन ते तीन तास आधी पूर्वसूचना देऊन उपयोग नाही. किमान बारा किंवा चोवीस तास आधी पूर्वानुमान जाहीर केले तर नुकसान टाळता येईल. नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होते आणि जीवित हानी टाळता येऊ शकते. भविष्यात वातावरणीय बदलामुळे अशा घटना वाढतच जाणार आहेत. यासाठी कृषी आणि पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. आत्तापासूनच त्याची तयारी होणे गरजेचे आहे.

------------------

कायमस्वरूपी यंत्रणा हवी...

वातावरणीय बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ४ किंवा ८ सेंटिमीटरने वाढणार आहे आणि हिमनद्या वितळणार आहेत एवढेच लोकांना माहिती आहे. परंतु समुद्र किनारपट्टीवरील लोकांना त्याचा त्रास होणार आहे. जमीन नापिक होणार आहे, हे पटकन लक्षात येत नाही. पण आता हे घडतंच राहाणार आहे,याकडे डॉ. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

-------------------------------

‘ढगफुटी’ झाली असे म्हणता येणार नाही

महाराष्ट्रातील अनेक भागात ढगफुटी झाल्याचे म्हटले जात असले तरी ढगफुटी कशाला म्हणतात तर एका तासात १०० मिलिमीटर किंवा १० सेंटिमीटर पाऊस झाला तर त्याला ढगफुटी असे म्हणता येईल. त्याचे अनुमान काढण्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असायला हवीत. ती आपल्याकडे आहेत का याचा विचार व्हायला हवा. आपण जोरदार पाऊस झालाय असे म्हणू शकतो पण ‘ढगफुटी’ झाले असे म्हणता येणार नसल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------

Web Title: Climate change has also changed the rainfall, such incidents will increase in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.