चतुरस्र अभिनेत्री स्मिता तळवलकर हरपली!
By Admin | Updated: August 7, 2014 00:18 IST2014-08-07T00:06:43+5:302014-08-07T00:18:29+5:30
कोल्हापुरात शोकसभा : विविध मान्यवरांची श्रद्धांजली

चतुरस्र अभिनेत्री स्मिता तळवलकर हरपली!
कोल्हापूर : चतुरस्र अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांना आज, बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
महामंडळाच्या कार्यालयात कार्यवाह सुभाष भुरके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेस सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती उपस्थित होते.
अध्यक्ष व्हायचे राहून गेले
माझा त्यांच्याशी संबंध चित्रपट महामंडळाच्या संचालिका म्हणून आला. त्या अत्यंत अभ्यासू आणि झोकून देऊन काम करणाऱ्या होत्या. खरे तर त्यांना महामंडळाचे अध्यक्ष व्हायचे होते. तशी संधीही दोन-तीन वेळा आली होती; त्यामुळे महामंडळाला पहिली महिला अध्यक्ष मिळाली असती; मात्र, दुर्दैवाने असे घडले नाही. त्यांची इच्छापूर्ती झाली नाही याचे शल्य आहे.
^^- सतीश रणदिवे
(संचालक, चित्रपट महामंडळ)
स्त्रीने आदर्श घ्यावा अशी...
स्मिता तळवलकर ही एक फक्त अभिनेत्री नव्हती, तर चतुरस्र कलाकार होती. तिने चित्रपट, नाटक, मालिकांसाठी जसे योगदान दिले त्याचप्रमाणे तिने केलेले सामाजिक कार्यही मोठे आहे. ‘एनएफडीसी’च्या संचालक मंडळावर ती होती. या संस्थेने जाहीर केलेल्या मानधनाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी येथील कलाकारांना मुंबईला जावे लागणार होते. मात्र, वृद्धांची अडचण समजून घेत स्वत: कोल्हापुरात येऊन तिने ते मंजूर केले होते. महामंडळाचे संचालकपदही तिने भूषवले होते. कोणत्याही स्त्रीने आदर्श घ्यावा, अशी ती कर्र्तृत्ववान स्त्री होती.
- सुभाष भुरके, कार्यवाह,
अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ
स्मित लोपले
अत्यंत धाडसी निर्माती, खेळकर अभिनेत्री, कुशल संघटक आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तम माणूस अशी स्मिताची ओळख होती. मराठी चित्रपटात त्याच-त्याच विषयांची मांडणी होत असताना तिने
वेगळ्या वळणावरचे आणि डोळ्यांत अंजन घालणारे चित्रपट निर्माण केले. माझ्या ‘घे भरारी’ या चित्रपटात
तिने महिला कारागृह अधिकाऱ्याची भूमिका केली होती. चित्रपट महामंडळाच्या माझ्या अध्यक्षपदाच्या काळात तिने मला खूप
सहकार्य केले. जयप्रभा स्टुडिओ आणि भालजींचे चित्रपट हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता. तिच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीचे स्मित लोपले आहे.
- यशवंत भालकर,
दिग्दर्शक
आनंदाचे झाड उन्मळून पडले
एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की ‘पोकळी निर्माण झाली’ अशी भाषा वापरली जाते; पण स्मिता यांच्या बाबतीत ही पोकळी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्री या सर्व बाजूंनी निर्माण झाली आहे. त्या उत्तम कार्यकर्त्या होत्या. आपल्या अभिनय प्रशिक्षण केंद्राद्वारे नव्या पिढीला घडविण्यात त्यांनी योगदान दिले. त्यांच्या ‘राऊ’ मालिकेत मी शाहू महाराजांच्या भूमिकेत होतो. सेटवर आम्ही कधी त्यांना नाराज किंवा खट्टू झालेले पाहिले नाही. त्यांच्या निधनामुळे आनंदाचे झाडच उन्मळून पडले आहे.
- भालचंद्र कुलकर्णी,
ज्येष्ठ अभिनेते