अभिजात चित्रपटांची पर्वणी

By Admin | Updated: February 2, 2017 03:46 IST2017-02-02T03:46:34+5:302017-02-02T03:46:34+5:30

विविध भाषांमधले ‘अभिजात’ (क्लासिक्स) चित्रपट तेही दुर्मिळ आणि मूळ दर्जात पाहायला मिळाले तर? ही ‘सुवर्णभेट’ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून (एनएफएआय) चित्रपटप्रेमींना

Classics of classical films | अभिजात चित्रपटांची पर्वणी

अभिजात चित्रपटांची पर्वणी

पुणे : विविध भाषांमधले ‘अभिजात’ (क्लासिक्स) चित्रपट तेही दुर्मिळ आणि मूळ दर्जात पाहायला मिळाले तर? ही ‘सुवर्णभेट’ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून (एनएफएआय) चित्रपटप्रेमींना दिली जाणार आहे. आज (दि. १ फेब्रुवारी) एनएफएआयचा ५३ वा स्थापना दिवस आहे. त्याचे औचित्य साधून दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी ‘अभिजात चित्रपटांच्या महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेने जतन केलेले काही दुर्मिळ चित्रपट नव्या डीसीपी प्रोजेक्टरवर रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. मूळ स्वरूपात हे चित्रपट जसे निर्मित करण्यात आले होते, त्या चित्रपटांचे ‘डिजिटायझेशन’ करून ते जतन करण्यात आल्याने मूळ दर्जात्मक चित्रपटाचा ‘फिल’ नव्या डीसीपी प्रोजेक्टरच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे.
पहिल्या दिवशी ‘मेघेढाका तारा’ (बंगाली), तन्नीर तन्नीर (तमिळ) आणि दो बिघा जमीन (हिंदी), तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे संगीत दिग्दर्शित आणि अभिनित ‘गुळाचा गणपती,’ ‘मथिलुकल (मल्याळम) व ‘कागज के फूल (हिंदी) हे ‘अभिजात’ चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दि. ४ रोजी एनएफएआय येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत ‘हेरिटेज वॉक’ आयोजिण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

एनएफएआयमध्ये
आज स्नेहमेळावा
कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाबरोबरच चित्रपट क्षेत्राशी संबंधित संस्था, व्यक्ती, अभ्यासक यांचा स्नेहमेळावा उद्या (बुधवारी) एनएफएआयच्या स्थापनादिनानिमित्त रंगणार आहे.

कोलकत्यातील निर्मात्याकडून
दुर्मिळ चित्रपटांचा खजिना उपलब्ध
अंजन बर्वे आणि नरेश बोर्डे यांनी आपल्याजवळील पोस्टर्स, बुकलेट्स असा १००० दुर्मिळ वस्तूंचा संग्रह एनएफएआयकडे सुपूर्त केला आहे. कोलकत्त्यातील सुनील जिंदाल या निर्मात्याकडून १६ एमएमच्या हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा खजिना उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये शर्बोन डे, राज बोधू, चंद्रनाथ अशा २५ चित्रपटांचा समावेश आहे.
दीप्ती नवलकडून मिळाली ‘चेतना’ची मूळ संहिता
अभिनेत्री दीप्ती नवल यांनी ‘चेतना’ या बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना’ची मूळ संहिता एनएफएआयला दिली आहे. तसेच दीप्ती नवल यांनी स्वत: दिग्दर्शित केलेला आणि गुलजार यांनी शीर्षकगीत लिहिलेला ‘दो पैसे की धूप, चार आनेकी बारिश’ हा अप्रदर्शित चित्रपटदेखील एनएफएआयला देण्याचे त्यांनी मान्य केले असल्याचे मगदूम यांनी सांगितले.

Web Title: Classics of classical films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.