दावे-प्रतिदावे, रंगले पैजांचे आखाडे

By Admin | Updated: February 23, 2017 02:20 IST2017-02-23T02:20:50+5:302017-02-23T02:20:50+5:30

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर तालुक्यातील गावोगावी

Claims counterpart | दावे-प्रतिदावे, रंगले पैजांचे आखाडे

दावे-प्रतिदावे, रंगले पैजांचे आखाडे

ओझर : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर तालुक्यातील गावोगावी चौकाचौकांत, हॉटेलमध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करीत असून, एकमेकांबरोबर कार्यकर्ते पैजांचे आखाडे भरवत आहेत.
जुन्नर तालुक्यात सात जिल्हा परिषद गट, तर १४ पंचायत समिती गण आहेत तालुक्यात आळे-पिंपळवंडी गटात आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशिकांत सोनवणे आपला माणूस आपली आघाडीकडून, शिवसेनेकडून मंगेश काकडे तर राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद लेंडे यांच्यात कडवी झुंज झाली तसेच बेल्हे राजुरी गटात राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार वल्लभ शेळके, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व तालुका राष्ट्रवादी काँगे्रस अध्यक्ष पांडुरंग पवार, शिवसेनेचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ व आपला माणूस आपली आघाडीचे एकनाथ शिंदे यांच्यात लढत झाली.
नारायणगाव-वारुळवाडी गटात सेनेच्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीच्या राजश्रीताई बोरकर तर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या पत्नी सोनाली पाटे यांनी अपक्ष उभे राहून या गटात चांगली रंगत आणली. धालेवाडीतर्फे हवेली-सावरगाव या गटात काँग्रेसचे सचिन हाडवळे, राष्ट्रवादीचे अरुण पारखे व सेनेचे गुलाब पारखे व आपला माणूस आपली आघाडीचे नीलेश चव्हाण तर भाजपाचे सेनेतून बंडखोरी केलेले सूर्यकांत ढोले यांनी या गटातील निवडणूक चर्चेची केली. तालुक्यातील या गटात वेगवेगळ्या गुपित राजकीय समीकरणांच्या चर्चेमुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते शेवटपर्यंत संभ्रमात होते.
विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या पाडळी-निरगुडे, डिंगोरे-पिंपळगाव व
धालेवाडी तर्फे हवेली-सावरगाव या गटातील उमेदवार ठेवून इतर गटात माघार घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले. नारायणगाव गटात शेरकर आशाताई यांना छुपी मदत करणार, तर ताई शेरकर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील धालेवाडी गटात मदत करणार.
आमदार सोनवणे सत्यशील शेरकर यांना पाडळी गटात मदत करणार, तर शेरकर त्यांना ओतूर गटात मदत करणार, अशी जोरदार चर्चा या गटात रंगत होती. तसेच, येणेरे गावातील राष्ट्रवादीच्या माजी प्रमुख नेत्याने तर मतदानाच्या अदल्या रात्री सेनेला मदत करण्याचे फोन केल्याची जोरदार चर्चा झाली; परंतु पक्षाचे कट्टर कार्यकर्ते ही समीकरणे मानण्यास तयार नाहीत. आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार असल्याच्या खात्रीने ते पैजा लावल्या जात आहेत. (वार्ताहर)

Web Title: Claims counterpart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.