शहर होणार वायफाय; मोफत सुविधा
By Admin | Updated: June 18, 2015 00:10 IST2015-06-18T00:10:51+5:302015-06-18T00:10:51+5:30
आयटी शहर म्हणून बिरुद मिळविणाऱ्या पुण्याची महापालिका लवकरच वायफाय होणार आहे. महापालिकेसह संपूर्ण शहरासाठी पालिके

शहर होणार वायफाय; मोफत सुविधा
पुणे : आयटी शहर म्हणून बिरुद मिळविणाऱ्या पुण्याची महापालिका लवकरच वायफाय होणार आहे. महापालिकेसह संपूर्ण शहरासाठी पालिके कडून मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प महापालिका भवन आणि पुणे स्टेशन ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावर सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्राथमिक सादरीकरण
नुकतेच करण्यात आले असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप यांनी बुधवारी दिली.
शहराचा समावेश ‘स्मार्ट सिटी’मध्ये करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पालिकेचा दैनंदिन कारभार ‘ई-गर्व्हनन्स’ करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. महापालिका भवनामध्ये वायफाय सुविधेसाठी या वर्षीच्या अंदाज पत्रकामध्येही निधीची तरतूद करण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवक अॅड. सिद्धार्थ धेंडे यांनी
उपस्थित केला होता. त्या वेळी जगताप यांनी वरील माहिती दिली. (प्रतिनिधी)
दिल्लीमध्ये वायफाय सुविधा पुरविणाऱ्या एका कंपनीने नुकताच महापालिकेशी संपर्क साधला होता. महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये या कंपनीने सादरीकरणही केले आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका भवन आणि शहरातील एका प्रमुख रस्त्यावर वायफाय सुविधा पुरविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये पुणे स्टेशन ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे, असे जगताप म्हणाले़
एका दिवसाला
५० मिनिटांचे मोफत इंटरनेट
-संबंधित कंपनीने या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबावर वायफायची यंत्रणा बसविण्यात येईल. या बदल्यात कंपनीच्या वतीने या खांबावर एलईडी दिवे बसविण्यात येतील.
-या इंटरनेट वापरासाठी नागरिकांनी एकदा लॉगइन केल्यानंतर, दर दिवशी ५० मिनिटांपर्यंत मोफत वायफाय सुविधा वापरता येईल, असा प्रस्ताव कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे; परंतु या प्रकल्पासंदर्भात आणखी अभ्यास करून आणि संबंधित कंपनीशी चर्चा करून, अन्य कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
-पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, संपूर्ण शहरात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असेही जगताप यांनी नमूद केले. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचेही कामही संबंधित कंपनीस देण्यात आल्याचे ते म्हणाले.