शहरामध्ये पुन्हा जाणवू लागली थंडी
By Admin | Updated: November 24, 2014 00:25 IST2014-11-24T00:25:13+5:302014-11-24T00:25:13+5:30
कधी कडक ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडी असा तिन्ही ऋतूंचा अनुभव गत पंधरवड्यात येत होता. दोन दिवसांपासून मात्र तापमानात घट झाल्याने शहरवासीय थंडी अनुभवत आहेत.

शहरामध्ये पुन्हा जाणवू लागली थंडी
पिंपरी : कधी कडक ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडी असा तिन्ही ऋतूंचा अनुभव गत पंधरवड्यात येत होता. दोन दिवसांपासून मात्र तापमानात घट झाल्याने शहरवासीय थंडी अनुभवत आहेत.
उत्तरेकडून येणारे थंड वारे विदर्भात वाढू लागले आहे. परिणामी गोंदिया भागात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा परिसरात तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. आॅक्टोबर हीटनंतर थंडीची लाट शहरात आली आहे. तापमानात घट होत आहे. सायंकाळी सहानंतर तापमानात घट होण्यास सुरुवात होते. रात्री बारा ते पहाटे सहापर्यंत हे तापमान अधिक प्रमाणावर खाली येत आहे. तापमानात घट झाली असली, तरी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. धुके आणि थंडीचा अनुभव शहरवासीय घेत आहेत.
शनिवारी शहरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. रविवारी मात्र आकाश निरभ्र होते. रात्री थंडी जाणवली.
मागील आठवड्यात अचानक आलेल्या पावसाने भातपिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. नुकत्याच पेरलेल्या गहू, हरभरा पिकाचे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना होती. मात्र, हवामानात पुन्हा बदल झाला आहे. हे वातावरण गहू, हरभरा पिकासाठी पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)