शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात
By Admin | Updated: January 7, 2015 00:48 IST2015-01-07T00:48:35+5:302015-01-07T00:48:35+5:30
शहरातील कचरा आंदोलनाबाबत सलग सहाव्या दिवशीही तोडगा निघू न शकल्याने आता महापालिका प्रशासनाही हतबल झाले

शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात
पुणे : शहरातील कचरा आंदोलनाबाबत सलग सहाव्या दिवशीही तोडगा निघू न शकल्याने आता महापालिका प्रशासनाही हतबल झाले असून, शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच एकमेव कचरा प्रक्रिया करणारा रोकेम प्रकल्पही तीन दिवसांपासून बंद असल्याने
आता महापालिकेची दारोमदार शेतकऱ्यांकडून नेल्या जाणाऱ्या कचऱ्यावर असेल.
दरम्यान, आज दिवसभरात शहराच्या हद्दीजवळील शेतकऱ्यांनी सुमारे ४०० टन ओला कचरा स्वीकारला आहे. त्यामुळे महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
१ जानेवारीपासून शहरातील कचरा उरुळी देवाची येथील डेपोत आणण्यास ग्रामस्थांनी विरोध सुरू केला आहे. त्यामुळे महापालिकेकडून आपल्या पातळीवर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असली, तरी आता पालिकेची यंत्रणाही कोलमडून पडू लागली आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागात हे ढीग साचण्यास सुरुवात झाली असून, काही प्रमाणात उपनगरांमध्येही हीच स्थिती असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
शहरातील नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करून देत नसल्याने दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेने आपले जवळपास १,६०० कर्मचारी प्रत्येक कचरा कंटेनरवर वर्गीकरणासाठी नेमले होते. मात्र, पुरेशी साधनसामग्री नसल्याने या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे वर्गीकरण सुरू असताना, कचरा पेट्यांमध्ये इंजेक्शन, सॅनिटरी नॅपकीन, लहान तसेच ज्येष्ठ नागरिकांचे डायपर, हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्ट येऊ लागल्याने अनेक कर्मचारी धास्तावले असून, त्यांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
रोकेमही बंद
शहरातील मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारा रोकेम प्रकल्पही तीन दिवसांपासून बंद आहे. या प्रकल्पाचा बेल्ट तुटल्याने तो बंद आहे. त्यामुळे किमान २०० ते ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्पही बंदच असल्याने महापालिकेच्या अडचणीत आणखीनच भर पडली असून, या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास शहरातील कचऱ्याची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.