आघाडीमुळेच थांबला शहराचा विकास
By Admin | Updated: January 31, 2017 04:16 IST2017-01-31T04:16:57+5:302017-01-31T04:16:57+5:30
पुणे शहराचा विकास महापालिकेच्या सत्तेत गेली सलग १० वर्षे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच थांबला आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश

आघाडीमुळेच थांबला शहराचा विकास
पुणे : पुणे शहराचा विकास महापालिकेच्या सत्तेत गेली सलग १० वर्षे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच थांबला आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, नियोजनशून्य अशा शब्दांत बापट यांनी महापालिकेच्या कारभाराची संभावना केली.
‘निष्क्रियतेची १० वर्षेन अशा नावाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाबाबत आलेल्या बातम्यांची कात्रणे, छायाचित्रे यांचा त्यात समावेश आहे. बापट यांच्या उपस्थितीत कॉमन मॅनच्या गणवेशात असलेल्या युवकाच्या हस्ते काळी फीत कापून रविवारी सकाळी या प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच पक्षाचे नगरसेवक, उमेदवारासाठी इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘केंद्रात, राज्यात व महापालिकेत याच दोन पक्षाची १० वर्षे सत्ता होती; मात्र त्यांना पुणे शहराच्या विकासासाठी काहीही करता आले नाही. नियोजन नाही, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार यामुळे शहराचा विकास खुंटला. याउलट, भाजपाने केंद्र व राज्यातील गेल्या दोन वर्षांच्या सत्तेत मेट्रो, स्मार्ट सिटी, पुणे विकास आराखडा, रिंगरोड, पीएमआरडीएची स्थापना, मुळा-मुठा शुद्धीकरण आदी प्रकल्पांना चालना दिली. महापालिकेतही एकहाती सत्ता मिळाली तर हे सर्व प्रकल्प गतीने मार्गी लावता येतील.’’ गोगावले यांचेही या वेळी भाषण झाले.
सार्वजनिक स्वच्छता, महापालिका रुग्णालयातील गैरसोयी, अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, वाहतूककोंडी, बीआरटी, सार्वजनिक
वाहतूक, शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार, प्रदूषण अशा विषयांवरील बातम्या, लेख, छायाचित्रे यांचा प्रदर्शनात समावेश आहे. मंगळवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. (प्रतिनिधी)