शहर गारठले!

By Admin | Updated: March 4, 2015 00:49 IST2015-03-04T00:49:06+5:302015-03-04T00:49:06+5:30

अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपल्यानंतर सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळी व सायंकाळी अनेक भागात धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

The city is frozen! | शहर गारठले!

शहर गारठले!

पिंपरी : अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपल्यानंतर सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळी व सायंकाळी अनेक भागात धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्री व पहाटेच्या तापमानात कमालीची घट झाल्याने लोक पुरते बेजार झाले आहेत. दिवसाचे तापमानही घटल्याने कडक उन्हातही गारठ्याचा परिणामी हिवाळ्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. ऋतुचक्रातील बदलाने हिवाळा लांबणीवर पडून आगामी पावसाळ्याच्या क्रमामध्ये फरक पडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
शनिवारी-रविवारी सपाटून पाऊस झाल्याने हवेतील बाष्पाचे दिवसाचे प्रमाण वाढले असून, ते २९.९९ वर पोहोचले आहे. कमाल तापमानात मागील दहा दिवसांचा विचार करता ३२ अंशांवरून २६.७ पर्यंत घसरण झाली आहे. तर किमान तापमानही १८ वरून १०.६ अंशांपर्यंत खाली आले आहे. याचबरोबर प्रतितास ५ किलोमीटरने हवा
वाहत आहे. या वाऱ्यामुळे वातावरणातील गारठा अधिकच वाढत आहे. परिणामी नागरिकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही स्वेटर, उबदार कानटोप्यांचा वापर करावा लागत आहे.
इतर वर्षांमध्ये मार्च महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागत असत. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत असत. मात्र या वर्षी याच्या अगदी उलट चित्र पाहण्यास मिळत आहे. सायंकाळी सहानंतरच गारठा प्रचंड जाणवत आहे. रात्री थंडीचे प्रमाण खूपच वाढत आहे. पहाटेपासूनच पवना नदीकाठालगतचा परिसर, शहरालगतच्या ग्रामीण भागातील सखल भागात धुके दाटल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, कामगारांना थंडीचा त्रास सोसावा लागत आहे. पावसाने गवत आणि इतर जळणही भिजल्याने शेकोटी पेटविण्याची सोय राहिली नसल्याने थंडीचा कडाका सोसण्याखेरीज पर्याय उरला नाही.

चहाचा व्यवसाय तेजीत
४थंडीचा त्रास थोडा कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून चहाचा आस्वाद घेण्यास पसंती मिळत आहे. परिणामी हॉटेल, चहाच्या टपऱ्यांमध्ये व खास चहाच्या ठेल्यांवर समूहाने येणाऱ्यांचे प्रमाण दोन दिवसांत वाढल्याचा प्रत्यय येत आहे. परिणामी चहाविक्रेत्यांचा धंदा चांगलाच तेजीत आला आहे. इतर दिवसांच्या तुलनेत तिप्पट ग्राहक मिळत असल्याची प्रतिक्रिया पिंपरी येथील चहा विक्रेत्यांनी दिली.

Web Title: The city is frozen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.