डेंग्यूच्या विळख्याने शहर भयभीत
By Admin | Updated: November 7, 2014 00:30 IST2014-11-07T00:30:18+5:302014-11-07T00:30:18+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचा प्रार्दूभाव वाढत आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डेंग्यूच्या विळख्याने शहर भयभीत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचा प्रार्दूभाव वाढत आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी थेरगावातील खासगी रुग्णालयात श्वेता सुनिल चासकर (रा. सेक्टर क्रमांक २८, प्राधिकरण, निगडी) या तेरा वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. शहरात गेल्या वर्षभरात डेंग्यूने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
श्वेताला २६ आॅक्टोबरला तीव्रताप आणि थंडी भरुन आली. उपचारासाठी निगडीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाही तिची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे ३१ आॅक्टोबरला थेरगावातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, बुधवारी रात्री श्वेताची प्रकृती अधिकच खालावली. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
श्वेता निगडीतीलच कॅम्प एज्युकेशन विद्यालयात आठवी इयत्तेत शिकत होती. वडील व्यवसाय करतात. तर आई गृहीणी आहे. मोठा भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. हुशार आणि मनमिळाऊ स्वभाव असलेल्या श्वेताच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबवित असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरात या वर्षभरात ३४७ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.
तसेच दररोज रुग्ण दाखल होत आहेत. लाखो रुपये खर्च करुनही आवश्यक त्या भागात फवारणी व धुरीकरण होत नाही. (प्रतिनिधी)