शहराला पावसाचा जोरदार तडाखा
By Admin | Updated: August 25, 2014 05:08 IST2014-08-25T05:08:09+5:302014-08-25T05:08:09+5:30
गेल्या चार दिवसांपासून पुण्यावर पावसाने चांगलीच कृपा केली आहे. उनाडपणे अशांत होऊन सर्वत्र हा पाऊस कोसळत आहे.

शहराला पावसाचा जोरदार तडाखा
पुणे : गेल्या चार दिवसांपासून पुण्यावर पावसाने चांगलीच कृपा केली आहे. उनाडपणे अशांत होऊन सर्वत्र हा पाऊस कोसळत आहे. काल पुणेकरांना अक्षरश: झोडपल्यानंतर आजही सर्वत्र पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले. रविवार असल्याने खरेदी करण्यासाठी पुणेकर आज घराबाहेर पडले होते. त्यांची चांगलीच धांदल उडाली. दिवसभरात १२ मिमी पावसाची नोंद झाली.
शहरातील विविध भागांतील झाड पडण्याच्या आणि सखल भागातील घरात पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. दुपारपासून विश्रांती न घेता पाऊस बरसत होता. त्यामुळे रविवारी शहराला जोरदार पावसाचा तडाखा बसला. शहरात मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, वारजे परिसरात दिवसभरात चांगला पाऊस झाला. शहरातील विविध भागांतील सोसायट्यांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी घुसले. जनवाडी परिसरात नीलज्योती सोसायटीमध्ये झाड पडल्याने पाच दुचाकींचे नुकसान झाले. कसबा पेठ येथे झाड पडल्याची घटना घडली. (प्रतिनिधी)