टोळीयुद्धामुळे शहर दहशतीखाली
By Admin | Updated: September 23, 2014 06:57 IST2014-09-23T06:57:59+5:302014-09-23T06:57:59+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत

टोळीयुद्धामुळे शहर दहशतीखाली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत. एकीकडे ‘बेस्ट सिटी’चे पारितोषिक पटकाविणाऱ्या शहराची ओळख आता गुन्हेगारीचे शहर अशी होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा लोकांची आहे. पोलिसांनी या टोळ्यांना आणि त्यांना रसद पुरविणाऱ्यांना तथाकथित पुढाऱ्यांना हिसका दाखविण्याची वेळ आली आहे.
टोळ्यांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये गुंतलेले तरुण खून, मारमाऱ्या, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे करतात आणि या टोळीच्या नावाखाली वाहनचोरीपासून सोनसाखळ्या हिसकावण्यापर्यंतचे गुन्हे करण्यापर्यंतची ताकत इतर भुरट्या चोरट्यांची वाढली आहे.
किरकोळ कारणावरुन टोळ्यांचे प्रमुख समाजात दहशत निर्माण करीत आहेत. काही महिन्यांपासून आकुर्डीत टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात भडकले आहे. या ठिकाणी तीन टोळ्या असून, त्यांचे विविध कारणांवरून एकमेकांशी वैर आहे. तीनही टोळ्या स्थानिक असून, त्यामध्ये तरुणांची संख्याही मोठी आहे.
आकुर्डी गावठाण येथे १० सप्टेंबरला सराईत गुन्हेगारांनी गोळीबार करीत दहशत माजविली. हा गोळीबार सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुन्हेगारांनी केला. फरार आठ आरोपींपैकी पाच जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले, तरी या टोळीचा म्होरक्या सोन्या काळभोर व त्याचे अन्य साथीदार अद्याप फरार आहेत. गोळीबार आणि त्यानंतर माजविलेली दहशत यामुळे आकुर्डी व परिसरात नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अशातच रविवारी रात्री पुन्हा आकुर्डीत टोळीयुद्ध भडकले. गौरव साठे या सराईत गुन्हेगारावर आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. साठे ज्या टोळीशी जोडलेला आहे, त्यांच्या विरोधी टोळीनेच हल्ला केल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या अशा टोळीयुद्धामुळे रहिवासी दबावाखाली आहेत.
भांडणाचा वचपा काढण्यासाठी नऊ ते दहा जणांनी पिस्तूल व कोयत्यासह इमारतीत शिरून दहशत माजविली. ही घटना २१ एप्रिलला पिंपरीतील मिलिंदनगर येथील विशाखा इमारतीत घडली होती. यातील आरोपीही एका टोळीशी संबंधित होते. (प्रतिनिधी)