नागरिकांना पडला पाणीटंचाईचा विसर
By Admin | Updated: March 5, 2016 00:51 IST2016-03-05T00:51:17+5:302016-03-05T00:51:17+5:30
पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे

नागरिकांना पडला पाणीटंचाईचा विसर
पुणे : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे. गेल्या ३ महिन्यांत केवळ ५३ तक्रारी या हेल्पलाइनवर करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर तक्रारींचा सुरू झालेला ओघ कमी झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी, बांधकामासाठी वापरले जात असल्यास, पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे दिसून आल्यास, पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना कुणाल कुमार यांनी केल्या होत्या. पाण्याच्या तक्रारींसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सुरुवातीला तक्रारींचा मोठा पाऊस पडला. त्याची शहानिशा करून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये १५, जानेवारी २०१६ मध्ये २१, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये केवळ १७ तक्रारी या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांनी नोंदविल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अजूनही अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहेत. जलतरण तलावही बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, मात्र जलतरण तलाव चालविणाऱ्या ठेकेदारांनी त्यामध्ये सवलत मिळवून ते चालूच ठेवले आहेत. (प्रतिनिधी)