वर्षभरापासून आळंदीत पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. मात्र स्थानिकांना पुण्याला जाणार्या पाईपलाईनमधून बेसुमार पाणी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे. एकूणच आळंदीत पाणी पुरवठा नियोजन बिघडले आहे.
आळंदीकरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गेल्या वर्षभरापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या नियोजनशून्य कारभारामुळे दिवसाआड येणारे पाणीही बेभरवशाचे झाले आहे. गेल्या आठवडाभरात पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा अनियमीत आहे. त्यामुळे आळंदीत पाण्याचे हाल कायम आहेत. दुसरीकडे थेट भामा आसखेडहून पुण्याला पाणी नेले. मात्र या पाईपलाईनला आळंदीत व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यापार्श्वभूमीवर दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र दुरुस्तीच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याचे स्थानिक सांगत आहेत. दरम्यान सोमवारी (दि.११) पाईपलाईन लिकेज काढण्याचे काम सुरू असल्याने शहरात पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. परिणामी शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण झाली. नगरपरिषदेमार्फत शहरातील प्रभागांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला.
११ आळंदी
आळंदीत पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करताना.