चौक्यांची सरंजामशाही संपणार
By Admin | Updated: January 18, 2015 01:17 IST2015-01-18T01:17:22+5:302015-01-18T01:17:22+5:30
पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत.

चौक्यांची सरंजामशाही संपणार
पुणे : पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत. भोसरी एमआयडीसीतील एका युवतीच्या छेडछाडीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे तिला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदार आपली कैफियत मांडू शकणार आहेत. तसेच, पोलीस चौक्यांच्या सरंजामशाहीलाही चाप बसणार आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही असाच निर्णय घेतला होता. त्याला काही प्रमाणात विरोधही झाला होता. परंतु, अनेकदा पोलीस चौकीस्तरावर काय सुरू आहे, याची माहितीच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच, पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी तक्रार घेत असल्यामुळे त्यामधील त्रुटींचा फायदा आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होतो.
कायद्यानुसार दखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोर होणे बंधनकारक आहे. मात्र, चौकीमधील घडामोडींची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.
अनेकदा शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडून बीट मार्शलला (गस्त) कळवलेली माहिती पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचना दिल्या. मार्चपर्यंत सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे कामकाज करायला सुरुवात करावी, असे आदेश असल्यामुळे या निमित्ताने पोलीस ठाणे स्तरावर त्याचाही सराव सुरू होईल.
४येत्या २६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच जर्मनी, अमेरिका आणि पॅरिसमध्ये घडलेल्या दहशवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन संजय कुमार यांनी केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद व्यक्ती, संशयास्पद साहित्य आढळून आल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. प्रजासत्ताक दिनाला शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.