चोरट्याला बदडले
By Admin | Updated: May 23, 2014 04:53 IST2014-05-23T04:53:25+5:302014-05-23T04:53:25+5:30
पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर दिवसाढवळ्या डल्ला मारणार्या नागेश देवेंद्र गिलबिले (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) याला नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले

चोरट्याला बदडले
पिंपरी : पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर दिवसाढवळ्या डल्ला मारणार्या नागेश देवेंद्र गिलबिले (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) याला नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार गुरुवारी दुपारी पिंपरीतील गोकुळ हॉटेलसमोर घडला. याप्रकरणी लक्ष्मी रितेश कंदारे (रा. लिंक रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. निर्ढावलेल्या चोरट्यांना भीतीच राहिलेली नाही. दिवसाढवळ्याही चोरीचे प्रकार घडत असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशाच एका सोनसाखळी चोरट्याला गुरुवारी नागरिकांनी चांगलाच धडा शिकविला. कंदारे यांचे पती एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पतीच्या आजाराने अगोदरच तणावात असलेल्या कंदारे यांच्यासमोर गुरुवारी आणखी एक संकट उभे राहिले. रुग्णालयासमोरील एका दुकानात त्या पिण्याच्या पाण्याची बाटली आणण्यासाठी जात होत्या. त्याच वेळी नागेशने रस्त्यातच कंदारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. मात्र, सोनसाखळी गळ्यातच अडकली. दरम्यान, घाबरलेल्या कंदारे यांनी आरडाओरडा करताच पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागेशला परिसरातील नागरिकांनी पकडले. रंगेहाथ सापडलेल्या नागेशला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. याबाबत कंदारे यांनी पोलीस नियंत्रण कक्षास कळविताच काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागेशला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेत कंदारे यांच्या गळ्याला किरकोळ जखम झाली. पिंपरी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून नागेशला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)