कन्हेरीतील चव्हाणवस्तीवर दरोडा
By Admin | Updated: December 16, 2014 04:30 IST2014-12-16T04:30:05+5:302014-12-16T04:30:05+5:30
कन्हेरी (ता. बारामती) येथील चव्हाणवस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून १७ तोळे सोने, ५० हजार रोख रकमेसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला़

कन्हेरीतील चव्हाणवस्तीवर दरोडा
काटेवाडी : कन्हेरी (ता. बारामती) येथील चव्हाणवस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून १७ तोळे सोने, ५० हजार रोख रकमेसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला़ या वेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दरोड्याची ही घटना रविवारी (दि. १४) रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली़
दरोडेखोरांच्या मारहाणीत बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्या आई भागूबाई चव्हाण हे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले़
कन्हेरी गावापासून २ किलोमीटर अंतरावर चव्हाणवस्ती आहे़ चव्हाण कुटुंबीय रात्री जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते़ राजेंद्र चव्हाण हे रिक्षाचालक असून, ते व्यवसायासाठी बारामतीत होते़ राजेंद्र चव्हाण यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, एक मुलगा व सासू भागुबाई यांच्यासह झोपल्या होत्या. रात्री १० वाजण्याच्या सुमारास कटावणीने दरवाजा उघडून २० ते २५ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोर १८ ते २५ वयाचे होते़ दरवाजा मोडण्याचा आवाज आल्यामुळे चोरटे घरात शिरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्या वेळी त्या मोबाईलवरून पती राजेंद्र यांना फोन लावण्याचा प्रयत्न करू लागल्या़ ते पाहून दरोडेखोरांनी घरातील सर्व मोबाईल फोडून टाकले. दरोडेखोरांच्या हातामध्ये तलवार, सत्तूर, चाकू, सुऱ्या, लोखंडी गज होते. त्यांनी या कुटुंबीयांना धमकावले. त्याला बाळासाहेब चव्हाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर चिडलेल्या दरोडेखोरांनी तलवारीने बाळासाहेब चव्हाण यांच्या पाठीवर वार केला. तसेच बाळासाहेब यांच्या आई भागूबाई यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. हे पाहून घाबरलेल्या सुनंदा चव्हाण यांनंी दरोडेखोरांना ‘मी तुमच्या पाया पडते. सोने-नाणे पैसे घेऊन जा; पण कुटुंबाला मारहाण करू नका’अशी विनवणी केली. दरोडेखोरांनी पायातील पैंजण, जोडवी, कानातील झुबे, रिंग्स, फु ले आदी दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली. त्या त्रासाने महिला ओरडू लागल्या. ‘इजा होत आहे, सर्व दागिने काढून देतो,’ असे सांगू लागल्या. त्यांनी आपले दागिने काढून दिले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा कपाट्यातील दागदागिन्यांकडे वळविला आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फे कण्यास सुरुवात केली.
शेतीच्या मशागतीसाठी आणलेले राजेंद्र चव्हाण यांचे २० हजार रुपये रोख, तर पाइपलाइनसाठी जमा केलेले बाळासाहेब चव्हाण यांचे ३० हजार रुपये व घरातील १० तोळे सोने दरोडेखोरांनी हिसकावले. (वार्ताहर)