समन्वयकाची धुरा सांभाळणारे ‘चोपदार’

By Admin | Updated: July 5, 2015 00:24 IST2015-07-05T00:24:09+5:302015-07-05T00:24:09+5:30

लाखो भाविकांचा सहभाग असलेला पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होताना या सोहळ्यात समन्वयाची धुरा सांभाळणारे ‘चोपदार’ पिढ्यान्पिढ्या सेवा देत आहेत.

'Chopdar' who manages coordinator's axle | समन्वयकाची धुरा सांभाळणारे ‘चोपदार’

समन्वयकाची धुरा सांभाळणारे ‘चोपदार’

पिंपरी : लाखो भाविकांचा सहभाग असलेला पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होताना या सोहळ्यात समन्वयाची धुरा सांभाळणारे ‘चोपदार’ पिढ्यान्पिढ्या सेवा देत आहेत. सोहळाप्रमुखांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, दिंड्यांना निरोप देणे व सोहळा व्यवस्थित चालविणे, अशी महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळत असतात.
कोणतेही कार्य करताना त्यामध्ये समन्वय असल्यास ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पार पडते. असाच प्रकार पालखी सोहळ्यातील आहे. या सोहळ्यात ३३० दिंड्या सहभागी होतात. दिंडीतील भाविकांसह इतर भाविकांचाही सोहळ्यात सहभाग असतो. मोठ्या लवाजम्यासह सोहळा पंढरीला मार्गस्थ होतो. सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना अथवा संबंधित व्यक्तींना काही निरोप असल्यास, महत्त्वाची सूचना द्यायची असल्यास, नैमत्तिक कार्यक्रमात काही बदल असल्यास चोपदारांमार्फत हे काम केले जाते. यासह रोजच्या रोज दिंड्या क्रमाने लावणे, दिंड्यांची हजेरी घेणे, त्यांची नोंद ठेवणे, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचे कीर्तन झाल्यानंतर पहाटे पालखी किती वाजता निघणार आहे, उद्याच्या कार्यक्रमात काही बदल असल्यास सूचना देणे, सोहळ्यात कोणाला अडचण असल्यास त्याबाबतची माहिती सोहळाप्रमुखांना देणे आदी जबाबदारी त्यांच्याकडे असते. यामुळे सोहळादेखील व्यवस्थितरीत्या मार्गक्रमण करीत असतो.
पालखी सोहळ्यात समाजआरती असते. पालखी रथ जिथे थांबेल, तिथेच दिंड्या थांबतात. सोहळ्यातील लवाजमा मोठा असल्याने दूर-दूर अंतरावर दिंड्या असतात. या दिंड्यांना आरतीची सूचना देणे गरजेचे असते. मात्र, ही सूचना देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य नसते. अशा वेळी चोपदाराकडील राजदंडाच्या एका सूचनात्मक इशाऱ्यावर समाजआरतीची सूचना दिली जाते. सूचना देण्यासाठी चोपदार रथावर चढतात. त्यांच्याकडील राजदंड तीन वेळा गोल फिरवितात. यावरूनच समाजआरतीची सूचना वारकऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे चोपदारांकडील राजदंडालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात परंपरेने चालणारी परभणीतील पाथरी तालुक्यातील माई दिंडी, बीडची कानसूरकर दिंडी आणि अंबेजोगाई येथील देशमुख दिंडी या तिन्ही दिंडीचे चोपदार हे सोहळ्यातही प्रमुख चोपदार म्हणून सेवा देत आहेत. यामध्ये माई दिंडीचे हभप काकामहाराज गिराम हे सेवा देत असून, त्यांची ही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील निवृत्तीमहाराज व आजोबा यांनीही सेवा दिली. कानसूरकर दिंडीकडून कानसूरकर सेवा देत असून, अंबेजोगाई येथील देशमुख दिंडीकडून देशमुख मंडळींची सेवा सुरू आहे. तर, काळूस येथील नारायण खैरे हे संस्थानचे चोपदार म्हणून सेवा देत आहेत. त्यांचीही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील शंकर लक्ष्मण खैरे यांनी चोपदारकी केली.

पिढ्यान्पिढ्या सेवा
-पालखी सोहळ्यासह तुकाराम बीज सोहळा, लळित, कार्तिकी यात्रा, जन्मोत्सव सोहळा या वेळी चोपदार हजर असतात. चारही चोपदार पिढ्यान्पिढ्यांपासून ही सेवा देत आहेत. रिंगण सोहळ्यातही चोपदाराची महत्त्वाची भूमिका असते. रिंगण लावून घेण्यासह तेथील पूर्ण तयारी पाहणे आदींचे नियोजन केले जाते.
चोपदाराचा पोशाख
-मखमली कापडाचा अंगरखा, डोक्यावर फेटा आणि खांद्यावर चांदीचा राजदंड, असा चोपदारांचा पोशाख असतो.

Web Title: 'Chopdar' who manages coordinator's axle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.