चिटफंडांना पोलिसांचेच अभय
By Admin | Updated: September 14, 2015 04:39 IST2015-09-14T04:39:42+5:302015-09-14T04:39:42+5:30
चिटफंड चालविणाऱ्या कंपन्यांचे थेट पोलिसांशीच साटेलोटे असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात हा धंदा तेजीत सुरू आहे. चिटफंडांना पोलिसांचेच अभय आहे.

चिटफंडांना पोलिसांचेच अभय
विश्वास मोरे , पिंपरी
चिटफंड चालविणाऱ्या कंपन्यांचे थेट पोलिसांशीच साटेलोटे असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात हा धंदा तेजीत सुरू आहे. चिटफंडांना पोलिसांचेच अभय आहे. फसवणूक होऊन माया गोळा करून कार्यालयास टाळा ठोकून पसार होईपर्यंत कोणताही चिटफंड मालक पोलिसांच्या हातात सापडत नाही. फसवणूक झालेल्यांना केवळ पोलीस आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे हाती काहीही पडलेले नाही.
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे. येथे कष्टकरी कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. कमी गुंतवणुकीत कमी वेळेत अधिक पैसे मिळताहेत असे कोणी आमिष दाखविले की, कामगारवर्ग निश्चितच आकर्षिक होतो. कष्टकऱ्यांची ही मानसिकता ओळखून चिटफंड चालकांनी आपला धंदा जोरात सुरू ठेवला आहे. दर आठवड्याला चिटफंड गैरव्यवहाराचे किमान एक प्रकरण उघडकीस येऊनही फसणाऱ्यांचे प्रमाण वाढतेच आहे. फसवणूकप्रकरणी साईप्रसाद चिटफंडाचे प्रमुख बाळासोहब भापकर, मुलगा शशांक भापकर आणि वंदना पत्नी यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला भापकराच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फसवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गाववाल्यांचेच काळे धन अधिक
चिटफंडातील काही कंपन्या गाववाल्यांपैकी काहींनी सुरू केलेल्या आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरीतील चिटफंड काही गाववाले चालवितात. तर काहींना या शहरातील सत्ताधारी नेत्यांचे पाठबळ आहे. भिशी आणि जादा व्याजाचे आमिष दाखवून या चिटफंड मालकांनी स्थानिक शेतकऱ्यांना जाळ्यात ओढले आहे. त्यांनी आपल्याच गावचा माणूस आहे, कोठे जाईल, असा विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. अवधूत चिटफंडची फसवणूक उघडकीस आल्यानंतर प्लॉटिंग आणि शेतजमीन विकून आलेले पैसे गुंतवणूकदारांची झोप उडविली आहे.
चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पुनावळे, ताथवडे, रावेत, वाकड, हिंजवडी येथील अनेक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काही लोकांनी पंचवीस लाख ते शंभर कोटींपर्यंतची गुंतवणूक केली आहे.
चिटफंड चालकांनी काळ्या धनावरच डल्ला मारल्याने दाद मागायची कोणाकडे अशी त्यांची अवस्था झाली आहे.
अशी होते फसवणूक
मार्केटिंगचे विविध फंडे चिटफंड चालक आजमावितात. चेन पद्धतीने आणि कमिशन तत्त्वावर हा कारभार चालतो. भिशी योजना किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखविले जाते. अमूक रकमेची गुंतवणूक करा. त्यावर आपणास दोन वर्षांत दामदुपट्ट पैसे मिळतील किंवा एक हजार रुपये गुंतवले, तर करोडपती कसे होता येईल, असे दर्शविणारा माहितीचा आणि आकड्यांचा खेळ करणारा, करोडपती होण्याचे चार्ट नागरिकांना दाखविले जातात. आपण स्वत: गुंतवणूक करून आणखी पाच जणांना आणि त्या प्रत्येकांना आणखी पाच जणांना आणले की, आपणास लाख रुपयांचा चेक मिळेल. तसेच दुबई, बँकॉक किंवा मलेशिया अशी परदेशवारीही करता येईल. असे स्वप्न दाखविले जात असल्याने त्या आमिषाला काही लोक बळी पडतात. लखपती किंवा करोडपती होण्याच्या नादात अनेक जण फसतात.
कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ
अनेक चिटफंड किंवा भिशीचालक सामान्यांच्या स्वप्नांचा चुराडा करून कोट्यवधींची माया गोळा करून पसार झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना फक्त पोलीस ठाण्यांच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे हाती काहीही पडलेले नाही. पोलीस आणि चिटफंड चालकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने कार्यालय सुरू असेपर्यंत तक्रारींची दखल घेतली जात नाही. हे प्रकरण आमच्या अखत्यारीत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जाते.
पंचवीसहून अधिक कंपन्या
शहरात पंचवीसहून अधिक चिटफंड कंपन्या आहेत. त्यात स्थानिकांच्या पाच ते सहा आणि अन्य कंपन्या महाराष्ट्राबाहेरील आहेत. आलिशान कार्यालये, सुटाबुटातील इंग्रजीत बोलणारे कर्मचारी पाहून कोणालाही भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. सहा महिने ते दोन वर्षे अशा कालखंडात जाळे पसरून फसवणूक करून सुमारे आठ ते दहा कंपन्यांनी पोबारा केलेला आहे.