मुलांचे हळवे बोल अन् मातांचे अश्रू...

By Admin | Updated: January 22, 2015 00:47 IST2015-01-22T00:47:21+5:302015-01-22T00:47:21+5:30

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही उक्ती सध्याच्या युगातून काहीशी हद्दपार झालेली काही उदाहरणे समाजासमोर आहेत.

Children's tired talk and tears of the mother ... | मुलांचे हळवे बोल अन् मातांचे अश्रू...

मुलांचे हळवे बोल अन् मातांचे अश्रू...

पुणे : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही उक्ती सध्याच्या युगातून काहीशी हद्दपार झालेली काही उदाहरणे समाजासमोर आहेत. आईच्या संस्काराचे ॠण फेडू न शकणारी एक संस्कारक्षम पिढी आजदेखील समाजात कार्यरत आहे, याचा मूर्तिमंत प्रत्यय मुलांच्या आईविषयीच्या हळव्या बोलांमधून उपस्थितांना अनुभवास मिळाला आणि त्या बोलांनी दैवरूपी मातांच्या गहिवरलेल्या नयनांनाही अश्रूंचा पाझर फुटला.
निमित्त होते, आदिशक्ती ग्रुपच्या आऊसाहेब पुरस्कार प्रदान सोहळ्याचे.
कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते बदामबाई बोरा, चित्रा गोखले, नलिनी पवार, वसुधा शिकारपूर, वसल्लाम्मा दुराईराज, सिंधुमती शिरोडकर आणि योगाचार्य बी. के. अय्यंगार यांची कन्या गीता अय्यंगार यांना बुधवारी ‘आऊसाहेब पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर, मधू नायर आणि आदिशक्ती ग्रुपचे दत्ताजी पवार उपस्थित होते.
छत्रपती शाहूमहाराज यांनी आजच्या युगात मुलांची आईवडिलांविषयीच्या असलेल्या वागणुकीचा परामर्श घेत मुलांनी आपली कर्तव्ये विसरू नयेत, असे सांगितले.
आईविषयीच्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. प्रामाणिकपणा, दुसऱ्यांना कधी न दुखवणे, दुसऱ्यांच्या चुकांना माफ करणे हे संस्कार आईने दिले. तिच्याच संस्काराच्या शिदोरीवर आयुष्याचे मार्गक्रमण सुरू असल्याची भावना प्रा. किरण बोरा, गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले, युवा शास्त्रज्ञ शैलेश पवार, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर आणि मनोज दुराईगार यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)

आईच मुलांना दिशा देऊ शकते
४आईचा त्याग आणि तिचे जीवनातील महत्त्व मुलांच्या वाणीतून ऐकताना खूप आनंद झाला असल्याचे सांगून गीता अय्यंगार म्हणाल्या, की एक काळ असा होता, की महिलांना योगाचे दरवाजे बंद होते. पण मला मात्र माझ्या वडिलांसारखे बनायचे होते. आईने मला योग क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आईच मुलांना आणि समाजाला दिशा देऊ शकते. ‘योगा’मध्ये सर्व समस्यांचे निराकरण सांगितले असून, मातांनीही त्याचा जीवनात अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

समाजात प्रतिष्ठित व्यक्तींच्या पंक्तीत विराजमान झालो असलो तरी यासाठी ज्या आईने कष्ट सोसले, तिचे कार्य हे निश्चितच मोठे आहे. आपल्या पंखांची सावली देताना गरूडभरारीची ऊर्मी देणारी आईच आहे. आज जे काही आहोत ते आईमुळेच. घरात त्रिकाल दारिद्र्य असतानाही धैर्याने तोंड देत शिक्षणातून स्वत:च्या पायावर उभी राहण्याची दिशा तिने दिली.
- अतुल शिरोडकर

Web Title: Children's tired talk and tears of the mother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.