मुलांच्या स्वप्नांना हवे संस्कारांचे बळ
By Admin | Updated: November 16, 2016 03:25 IST2016-11-16T03:25:51+5:302016-11-16T03:25:51+5:30
‘‘आज धावपळीच्या जगामध्ये विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. त्यांना स्वत:ला व्यक्त होण्यासाठी वेळच मिळत नाही. जगण्याचे आधुनिकीकरण

मुलांच्या स्वप्नांना हवे संस्कारांचे बळ
पुणे : ‘‘आज धावपळीच्या जगामध्ये विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. त्यांना स्वत:ला व्यक्त होण्यासाठी वेळच मिळत नाही. जगण्याचे आधुनिकीकरण करताना आपण विद्यार्थ्यांची नकळत कुचंबणा केली आहे. त्यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी केवळ संस्कार आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी केले.
प्रसिद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन एस. एम. जोशी सभागृहात मंगळवारी झाले. त्या वेळी बर्वे बोलत होत्या.
संमेलनाध्यक्ष डॉ. विकास आबनावे, स्वागताध्यक्ष प्रकाश रोकडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, माजी संमेलनाध्यक्ष शंकर आथरे, बंधुता ज्ञानपीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र भागवत, निमंत्रक महेंद्र भारती, संस्थेच्या सदस्या मीरा आबनावे, प्रा. सुनीता ननावरे आदी उपस्थित होते.
समारंभानंतर विद्यार्थ्यांच्या साहित्याचे सादरीकरण झाले. त्यामध्ये कविता, नाट्यछटा, निबंध, उतारावाचन, कथाकथन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदींचा समावेश होता. उत्कृष्ट सादरीकरणांना डॉ. संगीता बर्वे, अरुण खोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दुपारच्या सत्रात प्रबोधनयात्री काव्यसंमेलनात डॉ. भीम गायकवाड, मृणाल जोशी, मधुश्री ओव्हाळ, मीना शिंदे, विजय वडवेवार, संगीता झिंजुरके, अनिल दीक्षित यांनी कविता सादर केल्या. (प्रतिनिधी)