पुण्यावर चिकनगुन्याचे सावट
By Admin | Updated: February 14, 2016 03:20 IST2016-02-14T03:20:23+5:302016-02-14T03:20:23+5:30
गेल्या तीन वर्षांपासून पुण्याला वेठीस धरणाऱ्या डेंगीपाठोपाठ यंदा शहरावर चिकनगुन्या या संसर्गजन्य आजाराचे सावट घोंगावू लागले आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात ८० जणांना

पुण्यावर चिकनगुन्याचे सावट
पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पुण्याला वेठीस धरणाऱ्या डेंगीपाठोपाठ यंदा शहरावर चिकनगुन्या या संसर्गजन्य आजाराचे सावट घोंगावू लागले आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात ८० जणांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
आता शहरात डासांचा प्रादुर्भाव
वाढत असल्याने आणि हा आजार डासांच्या मार्फतच पसरत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात डासांचा प्रादूर्भाव सातत्याने वाढताना दिसून येत आहे. पावसाळयानंतर प्रामुख्याने आॅक्टोबरपासून ते मे महिन्यापर्यंत शहरात डासांचा प्रादूर्भाव होत असतो. डासांमधून डेंगी, मलेरिया आणि चिकनगुन्या हे आजार पसरतात. पाच वर्षांपूर्वी पुण्यासह राज्यात मलेरियाचा मोठा प्रादूर्भाव होता. मात्र पालिकेले केलेल्या उपाययोजनांमुळे मलेरियाचे रुग्ण घटले पण डेंगीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने डेंगीचा पुण्यात उद्रेक होत असल्याचे चित्र आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. गेल्यावर्षी डेंगीची लागण झालेले एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. तर चिकनगुन्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पूर्ण वर्षभरात अवघी १५ इतकीच होती. पण या वर्षीच्या सुरूवातीपासून शहरात चिकनगुन्याचे रुग्ण सापडू लागले आहेत.
जानेवारी महिन्यात शहरात चिकनगुन्याची लागण झालेले तब्बल ६८ रुग्ण सापडले. तर दि. १ ते १३ फेब्रुवारी या काळात चिकनगुन्याची लागण झालेले १२ रुग्ण सापडले आहेत. त्या तुलनेत यंदा डेंगीची लागण झालेले ३० रुग्ण सापडले. मलेरियाची लागण झालेले ३ रुग्ण शहरात सापडले आहेत.(प्रतिनिधी)