आईसह प्रियकराकडूनही चैतन्यला मारहाण
By Admin | Updated: August 8, 2015 00:51 IST2015-08-08T00:51:14+5:302015-08-08T00:51:14+5:30
चैतन्यच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आई राखी व तिचा प्रियकर सुमित मोरे यांनी केलेल्या मारहाणीमुळे चैतन्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आईसह प्रियकराकडूनही चैतन्यला मारहाण
येरवडा : चैतन्यच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आई राखी व तिचा प्रियकर सुमित मोरे यांनी केलेल्या मारहाणीमुळे चैतन्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. राखी व सुमित यांच्यातील अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मारहाण झाल्यापासून चैतन्यला ससूनमध्ये नेईपर्यंत त्याच्या शेजाऱ्यांना या प्रकरणाची अजिबातच कल्पना नव्हती. बुधवारी मध्यरात्रीनंतर ससूनमध्ये नेल्यानंतर राखीने इमारतीतील शेजारील महिलेला दूरध्वनीवरून चैतन्यच्या निधनाची बातमी कळवली होती. चैतन्यच्या आकस्मिक मृत्यूमुुळे तो राहत असलेल्या इमारतीतील मुले, महिला व नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. येथील महिला व लहान मुले अद्यापही यातून सावरलेले नाहीत. त्याच्या खुनामध्ये आई राखी बालपांडेचाच सहभाग असल्याचे पाहून सर्वजण संताप व आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
चैतन्य हा दीड-दोन वर्षांपासून आई, आजी व मावशीसमवेत टिंंगरेनगरमधील एस. बी. एनक्लेव इमारतीतील पहिल्या मजल्यावरील क्रमांक दोनच्या सदनिकेत राहत होता. चैतन्यला आजार असल्याने व्यवस्थित चालता येत नव्हते. तो दोन्ही पायांच्या टाचा वर करून बोटांवर चालत असे. राखीने तिची बहीण व आईसमोरही चैतन्यला अनेक वेळा मारहाण केली होती. या दोघींनीही तिला समजून सांगूनही राखीच्या वागण्यात फरक पडत नव्हता.
राखीच्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिची बहीण ठाण्यातील पतीच्या घरी गेली. त्यानंतर अलीकडील काळात तर राखी चैतन्यला नीट जेवणही देत नव्हती. यावरून राखी व तिच्या आईमध्ये अनेक वेळा वादावादी होत असे. मात्र, एके दिवशी राखीने आईलाच मारहाण करून घराबाहेर काढले. त्यामुळे तिची आई आठवडाभरापूर्वीच नागपूरला राहायला गेल्याचे या इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.
राखी चैतन्यचा नीट सांभाळ करीत नसल्याने राखीची आई व बहिणीला त्याची काळजी वाटत होती. त्या दोघीही इमारतीतील महिलांशी संपर्कात होत्या. राखी चैतन्यला दिवसभर घरात कोंडून कामावर जात होती. राखी घरात नसताना तरी त्याला काहीतरी खायला द्या व त्याच्यावर लक्ष ठेवत जा, असे या दोघीही या इमारतीतील शेजाऱ्यांना नेहमी विनंती करीत असत. मात्र, राखीने सदनिकेच्या सर्व दरवाजांना कुलूप लावून चैतन्यला आतमध्ये कोंडण्यास सुरुवात केल्याने शेजाऱ्यांनाही त्याला काहीही मदत करता येत नव्हती. ही बाब त्यांनी राखीच्या आईलाही कळवली होती. चैतन्यला त्याच्या वडिलांकडे पाठवा अथवा ही बाब पोलिसांना कळवा, असेही शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, कुणी काही करण्याच्या आधीच चैतन्यवर काळाने घाला घातला. दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई करत राखी हिच्यासह सुमीत मोरे यालाही अटक केली आहे. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिला न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिचा प्रियकर सुमीत मोरे यालाही अटक करण्यात आली आहे.