चेक पोस्ट केवळ नावापुरते!
By Admin | Updated: February 11, 2017 02:30 IST2017-02-11T02:30:49+5:302017-02-11T02:30:49+5:30
निवडणूक कालावधीत शहरात येणाऱ्या संशयित वाहनांवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत

चेक पोस्ट केवळ नावापुरते!
पिंपरी : निवडणूक कालावधीत शहरात येणाऱ्या संशयित वाहनांवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणाहून अनेक वाहने ये-जा करीत असतानाही दुपारच्या काळात तपासणी केली जात नसल्याचे दिसून आले. काही चेक पोस्ट, तर अडगळीच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हे चेक पोस्ट केवळ नावापुरतेच उरले असल्याचे दिसून येत आहेत. महापालिका निवडणूक विभागाची आचारसंहिता लागू आहे. निवडणूक कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी नियोजन केले जात आहे. संशयित वाहनांवर करडी नजर राहण्यासाठी शहरात ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. यातील काही चेक पोस्टची लोकमत प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली.
तीन जणांचे पथक
शांततेत मतदानप्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून नियोजन केले जात आहे. यामध्ये शहरात येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. चेक पोस्टवर तीन जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी, निवडणूक विभागाचे कर्मचारी, तसेच व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. तपासणी केल्या जाणाऱ्या वाहनांचे चित्रीकरणदेखील केले जात आहे. रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
संशयास्पद वस्तूंची तपासणी
संशयित वाहन आढळल्यास अशा वाहनांची कसून तपासणी करणे, वाहनात काही संशयित वस्तू आढळल्यास कोठून आणली आहे, कोठे घेऊन जाणार आहे याबाबतची खात्री करणे. वाहनांतील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यांच्याकडेही कसून चौकशी करणे गरजेचे आहे.
निगडी
निगडीतील भक्ती-शक्ती चौक, किवळेतील मुकाई चौक, मोशी टोल नाका, तळवडेतील आयटी पार्क चौक, वाकड आदी ठिकाणी हे नाके उभारले आहेत. येथे निवडणूक विभागाचे कर्मचारी यासह पोलीस कर्मचारी तैनात आहेत. वाहन तपासताना त्याचे चित्रीकरणही केले जात आहे. मात्र, काही ठिकाणचे चेक पोस्ट लवकर लक्षातही येत नाहीत. चेक पोस्ट आहेत की नाहीत अशी स्थिती आहे.
किवळे
किवळेतील मुकाई चौकातील चेक पोस्ट बस टर्मिनलच्या आतमध्ये उभारण्यात आला आहे. येथेच कर्मचारयांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी वाहने नजरेसदेखील पडत नाहीत. अशा परिस्थितीत वाहनांची तपासणी कशी होणार असा मुद्दा उपस्थित होत आहे. वाहने येतात आणि जातात; मात्र त्याकडे लक्ष देता येत नाही.
वाकड
वाकड चौकातील चेक पोस्टवरही अशीच स्थिती होती. रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दोन कर्मचारी बसून होते. तेथून ये-जा करणारी वाहने जात होती. मात्र, त्याकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसून आले.