टोमॅटो बियाण्यात फसवणूक; फळधारणा होईना!
By Admin | Updated: July 6, 2015 04:38 IST2015-07-06T04:38:43+5:302015-07-06T04:38:43+5:30
टोमॅटोच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. टोमॅटो पिकांवर त्यामुळे फळधारणा न होता विविध रोग येऊ लागले आहेत.

टोमॅटो बियाण्यात फसवणूक; फळधारणा होईना!
मंचर : टोमॅटोच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. टोमॅटो पिकांवर त्यामुळे फळधारणा न होता विविध रोग येऊ लागले आहेत. लौकी येथील संतोष नंदाराम थोरात या शेतकऱ्याने टोमॅटो पिकात चक्क शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या आहेत. त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकाचे लागवडक्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. मागीलवर्षी टोमॅटो पिकाला मिळालेला बाजारभाव पाहता शेतकऱ्यांचा कल या वर्षी टोमॅटो पीक घेण्याकडे जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करून मोठे भांडवल गुंतविले आहे. टोमॅटो पिकासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे टोमॅटो पीक अक्षरश: वाया गेले आहे.
टोमॅटो लागवडीनंतर झाडे जोमात आली. मात्र, त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला. अक्सा, करपा, भुईडावणी या रोगांबरोबरच मूळ कुजण्याचे प्रमाण वाढले गेले. अर्थात, शेतकऱ्यांनी महागडी औषधी फवारणी केली. मात्र, बियाणेच निकृष्ट असल्यामुळे औषध फवारणी करूनही फारसा उपयोग झाला नाही. टोमॅटो झाडांना फळेच येत नाहीत, असा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. विषाणूजन्य रोगांमुळे झाडांची फुले व फळे जगत नाही. (वार्ताहर)
कृषी विभागाने
पंचनामे करावेत
लौकी येथील शेतकरी संतोष नंदाराम थोरात यांनी २० गुंठे क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले. टोमॅटोची झाडे मोठी झाली. मात्र, फुले व फळे आलीच नाही. त्यामुळे थोरात यांनी टोमॅटोच्या शेतात शेळ््या-मेंढ्या सोडल्या आहे. त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे पंचनामे
करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.