भामट्याकडून शिक्षकांना गंडा

By Admin | Updated: October 16, 2015 00:47 IST2015-10-16T00:47:25+5:302015-10-16T00:47:25+5:30

‘हॅलो, मी पुणे जिल्हा परिषदेमधून शिक्षण अधिकारी बोलतोय. माझा एक कर्मचारी तुमच्या भागात काही कामानिमित्त आला आहे

Cheating teachers | भामट्याकडून शिक्षकांना गंडा

भामट्याकडून शिक्षकांना गंडा

रहाटणी : ‘हॅलो, मी पुणे जिल्हा परिषदेमधून शिक्षण अधिकारी बोलतोय. माझा एक कर्मचारी तुमच्या भागात काही कामानिमित्त आला आहे. त्याला थोडी पैशांची अडचण आहे. त्याला ३,४ हजार द्या. मी तुम्हाला लगेच परत करतो.’ अशा प्रकारचे फोन शहरातील अनेक शाळांमध्ये येऊ लागले आहेत. या फोनला काही मुख्याध्यापक बळीदेखील पडले आहेत. मात्र, एका शिक्षकाच्या सतर्क बुद्धीमुळे तो भामटा वाकड पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
ह्या भामट्याचे नाव मधुकर लक्ष्मण जाधव (वय ४२, राहणार तापकीरनगर, काळेवाडी) आहे. मागील अनेक दिवसांपासून ह्या भामट्याने शहरातील नामवंत शाळांना फोन करून हजारो रुपये उकळले आहेत. एका कंपनीला फोन करून हा शहरातील नामांकित शाळांचे क्रमांक मिळवितो. तेथे एखाद्या कॉइन बॉक्सवरून किंवा एखाद्याच्या लँडलाइनवरून फोन करून शाळेच्या मुख्याध्यापकास फोन देण्यास सांगतो. शाळा परिसरात आलेल्या आपल्या कर्मचाऱ्याचे पैसे संपल्याने त्याला पैसे द्या, असे त्याने सांगतल्यानंतर अनेकांनी पैसे दिले. मात्र, आपण फसलो, हे कालांतराने कळूनही अनेक जण बदनामी नको म्हणून शांत आहेत.
प्राधिकरण निगडी येथील एका विद्यालयात त्याने मुख्याध्यापकाला फोन देण्यास सांगितले. नित्याचाच ठरलेला डायलॉग त्याने सांगितला. त्या मुख्याध्यापकाने लागलीच त्याला फोन केला. ठरल्याप्रमाणे मुख्याध्यापक पैसे घेऊन निघाले. आम्ही कुठे यावे, म्हणून त्यांनी पुन्हा फोन केला. मात्र, संबंधित फोन बंद लागल्याने त्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकाला फोन आला व ‘मी काळेवाडी येथील एका हॉटेलजवळ थांबलो आहे. तिथे तुम्ही या,’ असे त्याने सांगितले. मुख्याध्यापकाला संशय आल्याने त्यांनी ही बाब संस्थेच्या सचिवांना सांगितली व ते दोघे काळेवाडी येथे आले. मात्र, पुन्हा फोन लागेना. त्यांनी तेथील हॉटेलात जाऊन ‘येथे जाधव कोणी आहे काय?’ अशी विचारणा केली. मात्र, कोणीही पुढे येईना, म्हणून ते बाहेर पडले. तेवढ्यात दारूच्या नशेत तर्र असणारा जाधव बाहेर आला व म्हणाला, ‘मीच जाधव आहे. मला पैसे द्या.’
मात्र, शिक्षण अधिकाऱ्याचा माणूस दारू पिऊन तर्र कसा? त्याचा त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला खोलात माहिती विचारू लागले. मात्र, तो कोणतीही माहिती देत नव्हता. जास्तच संशय बळावल्याने त्यांनी त्याला काळेवाडी पोलिसांत घेऊन गेले. (वार्ताहर)

Web Title: Cheating teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.