स्वस्तात घरांच्या आमिषाने फसवणूक
By Admin | Updated: February 4, 2017 03:57 IST2017-02-04T03:57:12+5:302017-02-04T03:57:12+5:30
खेड तालुक्यातील एका गावाच्या गायरान जमिनीवर मोठा गृहप्रकल्प बांधून अगदी स्वस्तात घरे देण्याचे आश्वासन देऊन सामान्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

स्वस्तात घरांच्या आमिषाने फसवणूक
आंबेठाण : खेड तालुक्यातील एका गावाच्या गायरान जमिनीवर मोठा गृहप्रकल्प बांधून अगदी स्वस्तात घरे देण्याचे आश्वासन देऊन सामान्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार आणल्याने समोर आला आहे.
चाकणमधील काही जणांनी एकत्रित होऊन काही बड्या राजकीय नेत्यांची नावे पुढे करून त्यांच्या माध्यमातून संबंधित गायरान जमीन मिळवली. लाखभर रुपयांत हक्काचे घर देण्याचे खोटे आश्वासन देऊन अनेकांकडून प्रत्येकी वीस ते सत्तर हजार रुपयांपर्यंतच्या रकमा उकळण्यात आल्या आहेत.
वेगवेगळ्या संघटनेच्या काही जणांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. पैसे घेतल्यानंतरही गेल्या दीड ते दोन वर्षांत प्रत्यक्षात घरे बांधण्याच्यासंदर्भात काहीही हालचाल न दिसल्याने अखेरीस काही महिलांनी थेट पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. फसवणूक करणाऱ्यांपैकी काही जण बेपत्ता झाले आहेत.
स्वस्तात घरे देण्याच्या नावाखाली शेकडो नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. संबंधित संस्थेचे सभासदत्व मोफत देण्यात आले व सभासद नोंदणी झाल्यानंतर सर्व सभासदांसाठी एकत्रितपणे शासनाकडून अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी खेड तालुक्यातील एका गावातील गायरान जागेत व पुनर्वसन जागेत घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती अनेकदा बैठकांमधून देण्यात आली. पडलेल्या अनेकांनी ३० हजारांपासून सत्तर हजार ते एक लाख इतके पैसे संबंधितांकडे रोखीने जमा केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणमधील खंडोबामाळ भागात राहणाऱ्या सुमारे दहा महिलांनी याबाबत तक्रार अर्ज चाकण पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार वेगवेगळ्या संघटनेच्या पाच जणांनी एकत्रित येऊन एक संस्था स्थापन केली. मागील दीड वर्षात प्रत्येकी २० हजार ते एक लाख रुपये रोख स्वरुपात घेण्यात आले.
दोन कोटींची फसवणूक?
सुरुवातीला तक्रारदार महिलांकडून प्राप्त होत असलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार दीड ते दोन कोटींच्या घरात ही रक्कम असण्याची शक्यता आहे. यातील सर्व व्यवहार रोख स्वरुपात झालेले असल्याने त्याचे पुरावे गोळा केले जात आहेत. संबंधित संस्थेच्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे.
- महेश ढवाण
चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक