चपळगावकर, मोरेंचे नाव चर्चेत
By Admin | Updated: July 7, 2015 04:32 IST2015-07-07T04:32:02+5:302015-07-07T04:32:02+5:30
विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नाकारल्याने साहित्य महामंडळाने अध्यक्षपदासाठी नव्याने शोधमोहीम सुरू केली आहे.

चपळगावकर, मोरेंचे नाव चर्चेत
पुणे : विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नाकारल्याने साहित्य महामंडळाने अध्यक्षपदासाठी नव्याने शोधमोहीम सुरू केली आहे. चार वर्षांनी संमेलनाचा ‘विश्व’ योग अंदमानला जुळून येत आहे. अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, शेषराव मोरे यांच्या नावांची चर्चा आहे.
जोहान्सबर्ग आणि टोरांटो येथे होणाऱ्या विश्व संमेलनासाठी े ना. धों. महानोर यांची निवड करण्यात आली होती. मात्र, दोन्ही संमेलने रद्द होण्याची नामुष्की ओढवल्याने अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळू शकला नाही. २० डिसेंबर २०१४ रोजी महामंडळास पत्र पाठवून त्यांनी भूमिका सविस्तरपणे मांडली. राज्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत संमेलानध्यक्षपद भूषविणे योग्य वाटत नाही. त्यामुळे संमेलनाला जाण्यापेक्षा शेतीवाडीच्या प्रश्नांकडे मी जास्त गांभीर्याने पाहतो. मध्यंतरी खूप आजारी होतो. डॉक्टरांनी काही पथ्य पाळण्यास सांगून आरामाचा सल्ला दिला होता. विश्वसंमेलनापेक्षा मला शेती महत्त्वाची वाटते, माझ्या अडचणी समजून घ्याव्यात, हे माझे म्हणणे विचारात घ्यावे, असे सांगत संंमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे आता विश्व संमेलनासाठी साहित्यिक शोधण्याची वेळ महामंडळावर आली आहे.
तयारीसाठी दोनच महिने
> स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीचे औचित्य साधत यंदाचे संमेलन अंदमान येथे होत आहे. हे संमेलन आॅक्टोबरमध्ये होत असल्याने संमेलनाच्या तयारीसाठी केवळ दोन महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर अध्यक्षपदाची शोधमोहीम सुरू झाली आहे.
> आॅगस्टमध्ये महामंडळाची बैठक होत असून त्यात काही नावे ठेवली जाणार आहेत. त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.