गरबा ड्रेसचा बदलतोय ट्रेंड
By Admin | Updated: October 11, 2015 04:26 IST2015-10-11T04:26:07+5:302015-10-11T04:26:07+5:30
नवरात्री महोत्सवामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सजण्याची, नटण्याची वेगळीच क्रेझ दिसून येते. प्रत्येकाला चांगलं दिसायचं असतं. या महोत्सवातील पारंपरिक शिस्तबद्ध

गरबा ड्रेसचा बदलतोय ट्रेंड
पिंपरी : नवरात्री महोत्सवामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सजण्याची, नटण्याची वेगळीच क्रेझ दिसून येते. प्रत्येकाला चांगलं दिसायचं असतं. या महोत्सवातील पारंपरिक शिस्तबद्ध गुजराती नृत्य करण्याकरिता प्रत्येक व्यक्ती उत्सुक असतो. अशा वेळी कपडे बाजारपेठ कशी मागे राहणार? गरबा ड्रेसेसचा नवीन व बदलता ट्रेंड सर्वांनाच आकर्षित करत आहे.
पारंपरिक घागरा-चोली किंवा चनिया-चोली ही पारंपरिक गुजराती वेशभूषा फॅशनच्या जगात आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. यामध्ये मिरर वर्क केलेला घेरदार घागरा, चोली, मिरर वर्कची चुनरी असा झगमगीत दिसणारा पोशाख परिधान केला जातो. गरबा व दांडियाच्या गिरक्या घेताना घागऱ्याचा घेर जेवढा मोठा, तेवढा हा घागरा नृत्य करताना उठून दिसतो. बॉर्डर वर्क व विस्कोस किंवा बुट्टा असलेल्या साध्या घागऱ्यांची फॅशन बाजारात जास्त चालत आहे. यामध्ये घागऱ्याला मोठी बॉर्डर बुट्ट्याचे वर्क असते. यावर वेगवेगळे अलंकार घातल्यास हा घागरा क्लासिक दिसतो.
डिझायनर घागरा चोली व घागरा साडी यांची मागणी तरुणींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. यामध्ये साडीसारखा दिसणारा घागरा व ओढणी असते. आपल्याला हवा तसा साज करायला हा पर्याय उत्तम आहे. शिवाय, ज्या महिलांना साडी घालण्याची सवय असते, अशांकरिता हा सर्वांत कम्फर्टेबल पर्याय आहे. ज्या मुलींना साडी घालून नृत्य करणे सहज शक्य होत नाही, त्यांच्यासाठी रेडिमेड घागरा साडी घेणे केव्हाही चांगले. मुलांकरिता शॉर्ट व लाँग अशा प्रकारांमध्ये कुर्ता उपलब्ध आहे. तसेच धोती व घेरदार पॅटर्नमध्ये पायजमा आहे. पुरुषांचा हा फॉर्मल लुकमधील पोशाख आटोपशीर आहे. (प्रतिनिधी)
हिरव्या रंगाला मागणी
बदलत्या मागणी व जीवनशैलीनुसार गरबा ड्रेसेसचादेखील ट्रेंड बदलत चालला आहे. यामध्ये पारंपरिक गुजराती घागरा-चोली, डिझायनर घागरा, रेडिमेड घागरा साडी, एम्रॉयडरी घागरा चोली, शॉर्ट व लाँग कुर्ता पायजमा, धोती पायजमा, माता की साडी, फेटे, नेटची चुनरी, लटकन चुनरी, बीट्स चुनरी अशा विविध प्रकारे कपड्यांची बाजारपेठ सजली आहे. यामध्ये भडक रंगांची मागणी जास्त प्रमाणात आहे. यामध्ये लाला, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, केशरी, पांढरा, गुलाबी, आकाशी या रंगांची मागणी जास्त आहे.