सत्ता परिवर्तन, की पुन्हा राष्ट्रवादी?

By Admin | Updated: February 23, 2017 03:10 IST2017-02-23T03:10:37+5:302017-02-23T03:10:37+5:30

वीस वर्षांनंतर प्रथमच महापालिकेसाठी तब्बल ६८ टक्के मतदान झाले. पिंपरी-चिंचवडकरांचा

Change of power, again nationalist? | सत्ता परिवर्तन, की पुन्हा राष्ट्रवादी?

सत्ता परिवर्तन, की पुन्हा राष्ट्रवादी?

पिंपरी : वीस वर्षांनंतर प्रथमच महापालिकेसाठी तब्बल ६८ टक्के मतदान झाले. पिंपरी-चिंचवडकरांचा विक्रमी मतांचा कौल नेमका कोणत्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आहे. त्याचा गुरुवारी फैसला होणार आहे. महापालिकेच्या सत्तेत भाजपा-शिवसेना परिवर्तन घडवून आणणार की, पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळणार याची उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. मात्र, २००२ च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबरच्या आघाडीत राष्ट्रवादी सत्तेत आली. त्यानंतर गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार महेश लांडगे व आझम पानसरे हेही भाजपात दाखल झाले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला एकामागून एक धक्के बसले अन् भाजपाला बळ मिळत गेले. महापालिकेत केवळ तीन नगरसेवक असलेल्या भाजपाचे नेते सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पाहू लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक नेत्यांना ताकत दिली.
जुन्या सुभेदारांनी राष्ट्रवादीच्या महापालिकेतील सत्तेतील भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे काढण्यास सुरुवात केली. त्यामध्ये शवदाहिनीचे साहित्य खरेदी, मूर्ती खरेदी व शीतलबागचा पादचारी उड्डाणपूल यात राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला. तसेच, भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त सत्तेसाठी परिवर्तनाची हाक दिली. मात्र, गेल्या १५ वर्षांत केलेल्या विकासकामांचा अजेंडा पुढे करीत राष्ट्रवादीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२७ जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये खरी चुरस आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, एमआयएम व मनसेला मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.
निकालानंतर त्रिशंकु स्थिती
महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच विकास व पक्षाच्या अजेंड्यावर लढविली जात आहे. क्रॉस व्होटिंगमुळे कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना अशी त्रिशंकु स्थितीची शक्यता आहे.(प्रतिनिधी)

युती झाली ...तर परिवर्तनाची संधी
४महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तनासाठी शिवसेना व भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणातही तसाच निष्कर्ष होता. मात्र, राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपात गेलेल्या नेत्यांमुळे युतीला अडथळा निर्माण झाला. अखेरपर्यंत युती होऊ न शकल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपाला अंदाजे ३५ ते ४० जागा मिळण्याची शक्यता असून, शिवसेनेला २० ते २५ जागांचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीपूर्वी नाही, तर निवडणुकीनंतरही दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांना सत्ता परिवर्तन करण्याची संधी मिळण्याविषयी चर्चा आहे.

७७३ उमेदवारांचे आज भवितव्य
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील ७७३ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे. सत्ता राष्ट्रवादीला मिळणार, की भाजपाला मिळणार, या चर्चेने जोर धरला आहे. शिवसेना की काँग्रेस ठरणार निर्णायक ही चर्चा रंग भरू लागली आहे. मतमोजणी सकाळी दहापासून सुरू होणार असून, पहिला निकाल १२ पर्यंत हाती येईल.
मतदानप्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली असून, त्यासाठी गुरुवारच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ७७० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्त करून प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे सांगितले. या सर्व ११ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणाऱ्या मतमोजणी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. दौऱ्यात आयुक्तासह अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Change of power, again nationalist?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.