शहर राष्ट्रवादीचे नेतृत्व बदला
By Admin | Updated: August 12, 2014 03:53 IST2014-08-12T03:53:10+5:302014-08-12T03:53:10+5:30
भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी कासारवाडीतील एका हॉटेलात झाली.

शहर राष्ट्रवादीचे नेतृत्व बदला
पिंपरी : भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी कासारवाडीतील एका हॉटेलात झाली. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबर लांडे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवकांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वबदलाची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली, तर पक्षातील काही असंतुष्ट पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून अडचणी निर्माण होऊ शकतील. ही शक्यता लक्षात घेऊन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावेत, अशी आग्रही भूमिका लांडे समर्थकांनी घेतली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील विरोधात असलेल्या मोजक्या नगरसेवकांना वगळून लांडे यांनी अन्य नगरसेवकांना गुप्त बैठकीस बोलावले होते. भोसरीतील काही नगरसेवक, तसेच पक्षाच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी विरोधात असल्याने त्यांच्याकडून निवडणुकीत दगाफटका होऊ शकतो, याची विशेष खबरदारी म्हणून शहर कार्यकारिणीचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यात बदल करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. हे बदल घडून आले, तरच पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे सोईस्कर होणार आहे अन्यथा अपक्ष लढणेच फायद्याचे ठरेल, अशी चर्चा बैठकीत झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ नगरसेवक उपस्थित होते.
लांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीची चर्चा शहरभर होती. लांडे समर्थकांची गुप्त बैठक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्व बदलास कारणीभूत ठरते की काय, याबद्दलची उत्सुकता वाढविण्यास ही बैठक कारणीभूत ठरली आहे. (प्रतिनिधी)