सनई-चौघड्याचा घुमला आवाज
By Admin | Updated: September 29, 2015 02:14 IST2015-09-29T02:14:56+5:302015-09-29T02:14:56+5:30
मुंढवा-केशवनगर भागात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात गुलालाची उधळण करून अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला

सनई-चौघड्याचा घुमला आवाज
मुंढवा : मुंढवा-केशवनगर भागात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात गुलालाची उधळण करून अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी सहाच्या दरम्यान मुंढव्यातील सर्वच घरगुती व मंडळांच्या गणपतीचे विसर्जन झाले. सनई-चौघड्याच्या साथीने फुलांनी सजविलेल्या रथातून गणेशाची मिरवणूक काढण्यात आली.
मुंढवा भाजी मंडईतील जयहिंद मित्र मंडळातील पुण्यातील धुरंधर ढोल-ताशा पथकाचे मिरवणुकीमध्ये प्रमुख आकर्षण ठरले. गांधी चौकातील जयहिंद बाल मंडळाने भोलेनाथ ढोल-ताशा पथक, राममंदिर येथील नवजीवन तरुण मंडळाने दर वर्षीप्रमाणे पारंपरिक ढोल-ताशा पथकातून गणेशविसर्जन मिरवणुकीस सकाळीच प्रारंभ केला. दुपारनंतर हिंदू तरुण मंडळ, भोईराज मित्र मंडळ, शिवसंकेत क्रीडा प्रतिष्ठान, न्यू फ्रेंडशिप मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ सर्व मंडळे पारंपरिक वाद्यांवर भर देत मिरवणूक जल्लोषात गणेशाचे विसर्जन केले. महिला, बाळगोपाळ, वृद्ध यांच्यासह मुंढवा परिसरातील नागरिक विर्सजन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर प्रत्येक मंडळाच्या बरोबरीने मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. मुंढवा-केशवनगर परिसरातील सर्व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. (वार्ताहर)