जागतिक दर्जाच्या शेतमाल उत्पादनाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST2021-01-01T04:07:27+5:302021-01-01T04:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात शेतमालाला चांगलीच मागणी होती. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कोणत्याही मालाचा तुटवडा ...

जागतिक दर्जाच्या शेतमाल उत्पादनाचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात शेतमालाला चांगलीच मागणी होती. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कोणत्याही मालाचा तुटवडा पडला नाही. फक्त स्थानिकच नव्हे तर देशात आणि परदेशातही महाराष्ट्रातून विक्रमी शेतमाल पाठवला गेला. महाराष्ट्राने ६६ हजार ४९८ कोटी रूपयांची विक्रमी निर्यात कोरोना काळात केली. शेतमाल उत्पादनाचा हाच दर्जा कायम ठेवत उत्पादनवाढ करण्याचे आव्हान शेती क्षेत्रापुढे नव्या वर्षात असेल.
महाराष्ट्रातून डाळिंबे, लिंबू, कलिंगड, आंबा, केळ्यांपासून ते भाजीपाल्यापर्यंतच्या विविध शेतमालाची निर्यात झाली. आता नव्या वर्षात उत्पदनाचा वेग टिकवण्याचे आव्हान शेती क्षेत्रासमोर आहे. त्यादृष्टीने सरकारी साह्य मिळणे गरजेचे आहे. हे साह्य केवळ आर्थिक पातळीवरचे नसून तंत्रज्ञानाचेही असण्याची गरज आहे.
जगभरातील शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक बदल केले जात आहे. पिक पेरणीपासून ते पिककाढणीपर्यंत सर्वत्र यंत्रांचा वापर वाढला आहे. हे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील साध्याभोळ्या शेतकºयापर्यंत पोहचवण्याचे आव्हान आगामी वर्षात सरकारसमोर आहे. प्रयोगशाळांमधील संशोधनाकडे लक्ष देणे गरजेचे असून ते उत्पादनक्षमता वाढवणारे व शेतकऱ्यांसाठी सहजपणे, स्वस्त दरात उपलब्ध असणारे हवे आहे.
साखर उद्योग आगामी वर्षात इथेनॉलनिर्मितीच्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत. जगभरातील इंधनसाठे मर्यादीत होत चालल्याने इथेनॉल हा इंधनाला पर्याय म्हणून पुढे येत आहे. त्याचवेळी देशात गरजेपेक्षा जास्त साखर निर्मिती होत असल्याने साखर कारखान्यांना पर्यायाची गरज आहे. केंद्र सरकारने आगामी वर्षात राज्याला १०८ कोटी लिटर इथेनॉलनिर्मितीचे उद्दीष्ट दिले आहे. हा बदल ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारीसाठी अनुकूल ठरणारा असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.