डिजिटल समाजाला शिक्षण देण्याचे आव्हान

By Admin | Updated: February 9, 2017 02:55 IST2017-02-09T02:55:40+5:302017-02-09T02:55:40+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपला ६८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या विद्यापीठाने काही वर्षात मोठी कामगिरी केली आहे

Challenge of teaching the digital community | डिजिटल समाजाला शिक्षण देण्याचे आव्हान

डिजिटल समाजाला शिक्षण देण्याचे आव्हान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपला ६८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या विद्यापीठाने काही वर्षात मोठी कामगिरी केली आहे. इतर विद्यापीठांच्या तुलनेत प्रत्येक क्षेत्रात विद्यापीठ नेहमीच आघाडीवर आहे यात कोणतीही शंका नाही. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी विद्यापीठाने निधी उपलब्ध करून दिला. विद्यापीठाने पूर्वीच्याच गोष्टी पुढे घेऊन जाण्याबरोबरच आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षणाच्या ढाच्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
विद्यापीठांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण देणे गरजेचे आहे. पूर्वी सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विनाअनुदानित तत्त्वावरील शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्यात आली. परिणामी मोठ्या प्रमाणावर शिक्षणसंस्था सुरू झाल्या. मात्र, या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता केवळ बंद खोल्यांमध्ये शिक्षण देऊन चालणार नाही. १९९५ नंतर घडलेल्या इंटरनेटच्या क्रांतीमुळे ज्ञानाचे भांडार खुले झाले.
कोट्यवधी नागरिकांच्या हातात मोबाईल आल्याने ज्ञान मिळवणे सोपे झाले. स्मार्टफोनमुळे सर्वच क्षेत्रातील ज्ञान खुले झाले याला युगप्रवर्तन म्हणता येईल. आता तंत्रज्ञानाचे जागतिकीकरण सुरू झाले आहे. त्यातून डिजिटल समाज निर्माण झाला आहे. या समाजाला वर्गात बसून शिक्षकांकडून माहिती नको आहे. परंतु, त्यांना पदवी मिळवण्यासाठी विद्यापीठात किंवा महाविद्यालयात जावेच लागणार आहे. मात्र, ‘मुक्स’च्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने ७००हून
अधिक अभ्यासक्रम शिकणे शक्य झाले आहे.
जगभरातील साडेतीन कोटी लोक आॅनलाईन अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहे. त्यात भारतातील १० ते १२ टक्के लोकांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठांनी आॅनलाईन शिक्षणाचा विचार केला पाहिजे.
गुरुकुल पद्धतीने किंवा वर्गात बसून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची पद्धत बदलावी लागेल. तसेच केवळ डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास सुरुवात करणे अपेक्षित नाही. केवळ बाह्यरूप बदलून उपयोग नाही आंतररूप बदलावे लागेल. ड्रायव्हरलेस कार आणि वर्कलेस कारखाने तयार होत आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे अनेकांचे रोजगार जाणार आहे. परंतु, तांत्रिक बदलामुळेसुद्धा नवीन रोजगार निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना हे रोजगार मिळावेत, यासाठीचे ज्ञान दिले पाहिजे.
अनेक विद्यार्थी एकलव्याप्रमाणे शिक्षण घेतील आणि ज्ञान मिळवतील. मात्र, रोजगारासाठी त्यांना पदवी हवी आहे. केवळ यासाठी त्यांना विद्यापीठात यावे लागत आहे.
स्वत:चा विकास करण्याबरोबरच समाजाचा विकास करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा आहे. त्यामुळे विद्यापीठांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम
तयार करण्याची आवश्यकता
आहे. पुणे विद्यापीठानेच नाही तर सर्वच विद्यापीठांनी केवळ
अमेरिकेचे विकासाचे मॉडेल स्वीकारू नये. जगभरातील बौद्धिक व्यक्तींचे विचार स्वीकारून शिक्षणाच्या ढाच्यात बदल करण्याचा विचार करावा.
पुण्यातील शिक्षणतज्ज्ञांनी जातधर्माच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिले. पुण्याच्या शिक्षणाची केवळ देशातच नाहीतर जगभर चर्चा होते. आता डिजिटल समाजाला गरजेनुसार शिक्षण देऊन युगांतर घडवण्याचे आव्हान सर्व विद्यापीठांसमोर आहे.

Web Title: Challenge of teaching the digital community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.